महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी आणि अथांग निळाशार अरबी समुद्राची किनार लाभली आहे. या किनारपट्टीला भूप्रदेशाशी ७० खाड्या जोडतात. काही ठिकाणी प्रदूषणाचा अपवाद वगळता हे क्षेत्र निमखाऱ्या पाण्यातील विविध प्रकारच्या मत्स्य संवर्धनासाठी उपयोगात आणले जाते. निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी, मासे, खेकडा संवर्धनाचे प्रकल्प कार्यान्वीत आहेत. यामधील खेकडा हा प्रामुख्याने मोठे अर्थार्जन मिळवून देणारा घटक आहे. या खेकड्याला स्थानिक पातळीवर तसेच प्रादेशीक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मागणी आहे. खेकड्याची मासेमारी ही प्रामुख्याने झीले टाकून अथवा फाटकी जाळी टाकून केली जाते.
कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधून खेकडे हे मुंबई येथे पाठविले जातात. खेकड्यांना मिळणाऱ्या उत्तम प्रतीच्या भावामुळे तसेच वाढत्या मागणीमुळे खेकडा संवर्धन हा नविन उद्योग आता बाळसे धरु लागला आहे. रोजच्या रोज खेकडा पकडणारे मच्छीमार बांधवानी पकडलेले खेकडे बाजारात मिळेल त्या दराने विकणे क्रमप्राप्त असते. याचे मूळ कारण म्हणजे जिवंत खेकडे साठवून ठेवण्याची सोय नसणे किंवा मऊ कवचाच्या खेकड्यांना कठीण कवचाचे खेकडे खाण्याची शक्यता अथवा कमी दरात विकल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागते.
या खेकड्यांचे बिजोत्पादन हे नैसर्गिकरीत्या खाडीमध्ये होते त्याचप्रमाणे बंदीस्त परिस्थितीमध्ये हे बिजोत्पादन देखील व्यापारीतत्त्वावर भारतामध्ये सुरु आहे. या बिजोत्पादन केंद्रांमध्ये होणारे बिजोत्पादन हे मर्यादित असल्याने उत्त्म प्रतीचे बिज आणि त्यांची जगणूक यांचे प्रमाण अत्यल्प आहे. खेकड्यांना मिळणारा उत्तम प्रतीच्या भावामुळे तसेच वाढत्या मागणीमुळे खेकडा संवर्धन हा नविन उद्योग आता बाळसे धरु लागला आहे. खेकडा बिजाचा शाश्वत पुरवठा हा सर्वात मोठा घटक हा या संकल्पनेचा कणा कमकुवत करीत आहे. यासाठी चेन्नईहुन बिज मागविले जाते व संवर्धन केले जाते. यात देखील बिजाच्या गुणवत्तेबद्दल साशंकता असते, तसेच सदरचे बिज आणण्यासाठी येणारा खर्च हा न परवडणारा आहे. बिज ज्या पाण्यात वाढलेले असते त्या पाण्याचे भौतिक गुणधर्म आणि स्थानिक पाण्याचे भौतिक गुणधर्म यांमध्ये फरक पडल्याने देखील बिजाची मरतुक होणे, वाढ खुंटणे असे दुष्परीणाम पहावयास मिळतात. खेकडा हा प्रामुख्याने ३ पध्दतीने संवर्धीत केला जातो.१) तलाव पध्दतीने२) खाडीमध्ये बंदिस्त पध्दतीने (पेन कल्चर)३) तलावांमध्ये बंदिस्त तरंगत्या क्रेट्समध्ये
अधिक वाचा: अपरिपक्व मासा पकडणे, खरेदी-विक्रीवर निर्बंध
तलाव पध्दतीनेया पध्दतीमध्ये तलावमध्ये खेकड्यांची पिल्ले सोडली जातात. या पिल्लांना योग्य त्या मात्रेमध्ये खाद्य देण्यात येते. महिन्यातून दोन वेळा अमावस्या आणि पोर्णिमेच्या उधाणाच्या भरतीने समुद्राचे पाणी तलावामध्ये येते व निघून जाते. या पध्दतीमध्ये जगणूकीचे प्रमाण हे ४५ ते ५० टक्के इतकेच असते. त्याचप्रमाणे आपण दररोज खेकड्यांचे मुल्यमापन करु शकत नाही. या पध्दतीत खेकडे निसटून जाण्याचे प्रमाण जास्त असते.
खाडीमध्ये बंदिस्त पध्दतीने (पेन कल्चर)या पध्दतीने खाडीमध्ये ज्या ठिकाणी समुद्राच्या भरतीचे पाणी साधारणतः १ मी. उंच पर्यंत राहते तर ओहोटीचे वेळी १ फूटपर्यंत पाणी रहाते अशी सुयोग्य जागा निवडावी. या जागेला चारही बाजूनी कुंपण घातले जाते. या कुंपणाला आतील बाजूने तसेच बाहेरील बाजूने जाळी लावली जातात जेणेकरुन आतील खेकडे बाहेर जाणार नाहीत व बाहेरील भक्षक प्राणी आतमध्ये येऊ शकणार नाहीत. सदरची जाळी ही ओहोटीच्या वेळी जमिनीमध्ये १ फूट खोलवर पुरतात. या जागेमध्ये फिरण्यासाठी कॅटवॉक बांधले जातात. यांचा वापर खेकड्यांना खाद्य देण्यासाठी तसेच निगरानीसाठी करतात. कुंपणाची वेळोवेळी देखभाल करणे गरजेचे असते. या पध्दतीमध्ये प्रदुषणयुक्त पाणी जर संवर्धन क्षेत्रात शिरले तर संवर्धन क्षेत्रामधील खेकड्यांना त्रास होऊन त्यांची मरतूक होण्याचा संभव असतो जे कोणाच्याही हातात नसते.
तलावांमध्ये बंदीस्त तरंगत्या क्रेट्समध्येया प्रकारामध्ये प्रत्येक खेकड्यांसाठी स्वतंत्र प्लॅस्टिकचे क्रेट्स वापरले जातात. सदरचे क्रेट्स हे दोन बांबूच्यामध्ये एका सरळ रेषेत बांधले जातात. या बांबूना ठरावीक ठिकाणी फ्लोट्स लावले जातात जेणेकरुन सदरचे क्रेट्स हे तरंगते राहतात. या क्रेट्समधील खेकड्यांना खाद्य देण्यासाठी, निरीक्षण करणेसाठी वरचे बाजूस छीद्रे तर आतील विष्टा तसेच न खाल्लेले अन्न बाहेर जाण्यासाठी क्रेट्सच्या खालच्या बाजूस देखील छीद्रे असतात. या पध्दतीमध्ये तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यास पाणी तापल्याने तसेच प्लॅस्टिकचे क्रेटस तापल्याने खेकड्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
या खेकडा संवर्धनासाठी अत्याधुनिक पध्दतीच्या संचाची निर्मितीमुळे जिवंत खेकडे साठवून ठेवण्याची सोय उपलब्ध झाल्याने प्रत्येक खेकडा हा वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवण्याची सोय असल्याने मऊ कवचाच्या खेकड्यांना कठीण कवचाचे खेकडे खाऊ शकणार नाहीत व या खेकड्यांचे पृष्ठीकरणासाठी वाव आणि अवधी मिळाल्याने त्यांना उत्तम किंमत मिळू शकते. सदरचे संच हॉटेलमध्ये ठेवल्यास हॉटेल व्यावसायिकांना ग्राहकांना जीवंत खेकडे सहजगत्या उपलब्ध करुन देता येतील. या खेकडा संवर्धनासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या संचाची निर्मिती केल्याने पारंपारिक मच्छिमार बांधव, संवर्धक यांचा फायदा होईल. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल. या प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवरील खेकड्याचे उत्पन्न वाढीस मदत होईल.
श्री. कल्पेश शिंदे, प्रकल्प प्रमुख, खेकडा संवर्धन प्रकल्प ९४२२ ९६५ ८४९डॉ. प्रकाश शिनगारे, डॉ. आसीफ पागारकर, श्री. सचिन साटमडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी ४१५६१२