Join us

cage culture: मत्स्य उत्पादनासाठी आता पिंजरा तंत्रज्ञानावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 10:17 AM

वाढत्या तापमानात मत्स्य व बीज टिकून ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांचे संशाेधन

वाढत्या तापमानाचा परिणाम मत्स्य बिजाेत्पादन व संगाेपनावर हाेत असून, यामुळे उत्पादकांचे माेठे नुकसान हाेत आहे. या पार्श्वभूमीवर उत्पादन वाढीसह मर्तुकीचे प्रमाण कमी करून वातावरणाला अनुकूल मत्स्य उत्पादनासाठी पिंजरा तंत्रज्ञान, संशाेधन या क्षेत्रातील संस्थानी हाती घेतले आहे.

भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा मत्स्य उत्पादक देश आहे. जागतिक मत्स्योत्पादनात भारताचे ८ टक्के योगदान आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत, देशातील एकूण मत्स्य उत्पादन वाढत असून २०१९-२० मध्ये १४१.६४ लाख टनावरून २०२१-२२ मध्ये १६२.४८ लाख टन मत्स्य उत्पादनाची नोंद झाली आहे.

दरम्यान, मत्स्य उत्पादकांसमाेर माेठे आव्हान असून, तापमानात वाढ हाेत असल्याने मर्तुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे उत्पादकांचे माेठे नुकसान हाेत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाने विविध प्रकारचे संशाेधन हाती घेतले आहे.

आता पिंजरा तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, याला ‘केज कल्चर’ असे म्हणतात. हा पिंजरा समुद्राच्या पाण्यात खाेल ठेवून त्यामध्ये मत्स्य संगाेपन केले जात आहे. यामुळे मर्तुकीचे प्रमाण कमी करण्यासह भरघाेस उत्पादनासह मत्स्य वाढ उत्तम हाेत असून, दर्जा राखण्यास मदत हाेत आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय कृषी संशाेधन परिषदेच्या नैसर्गिक संसाधन, व्यवस्थापन विभागाचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी यांनी दिली.

टॅग्स :मच्छीमारपाणीतापमान