शांत झालेला समुद्र, कधी ऊन, तर कधी पाऊस असे मासेमारीसाठी पोषक वातावरण असल्याने आता सर्वच मासेमारी बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असून, मोठे मासे जाळ्यात सापडत आहेत. त्यामुळे मासेच सापडत नसल्याची ओरड आता थांबली असून, बाजारात मुबलक आवक होत आहे.
मुरुड तालुक्यात राजपुरी, एकदरा, मुरुड, मजगाव, दांडा, काशिद, बोलीं, कोर्लई, साळाव व चोरढे मिळून ७५० हून अधिक मासेमारी नौका सध्या मासेमारीसाठी व्यस्त झाल्या आहेत. सध्या मोठ्या आकाराची सुरमई मोठ्या प्रमाणात सापडत असून पापलेट, हलवा, रावस, कोलंबी, बांगडे, ओले बोंबीलही मासळीही बाजारात दिसत आहे. त्यामुळे मासळी बाजारातील दुष्काळाचे सावट संपत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
आवकही वाढली, भावही मिळतोय- १ ऑगस्टपासून मासेमारी सुरु झाल्यानंतर काही दिवस वातावरणामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाणे टाळले होते. मात्र नारळी पौर्णिमेनंतर मात्र मासेमारी बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. परत येताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.- सध्या मुरुड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असून, कधी ऊन, तर कधी पाऊस पडत असल्याने मासेमारीसाठी उपयुक्त वातावरण तयार झाले आहे. मासेमारीसाठी गेलेल्या सर्वच बोटींना मासे मिळत असल्याने स्थानिक मच्छिमार सुखावले आहेत, मासळीला भाव सुद्धा मिळत आहे.
सध्या मासळीचा चांगला हंगाम सुरु झाला आहे. मुबलक मासळी मिळत असून भावही चांगला मिळत आहे. मासळी निर्यात सुद्धा होऊ लागली आहे. यात सातत्य राहिले तर मासळी व्यवसाय टिकून राहणार आहे. - मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छिमार संघ