नाशिक : राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP) हा केंद्र शासनाच्या मत्सव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने हाती घेतलेला परिवर्तशील उपक्रम आहे. विभागांतर्गत येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्था यांनी एन.एफ. डि . पी (NFDP) पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नाशिक प्रदिपकुमार जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
एनएफडीपीचे उद्दीष्ठ मत्स्यव्यवसायावरील विविध सरकारी कार्यक्रम व योजनांची माहिती प्रदान करणे आहे. एनएफडीपीच्या माध्यमातून प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजना (PM-MKSSY) लाभ घेता येणार आहे. यामुळे नोंदणी, क्रेडिट सुविधा, मत्स्यशेती विमा प्रोत्साहन, कामगिरी अनुदान, ट्रेसबिलिटी सिस्टम आणि वित्तीय प्रोत्साहन इत्यादी बाबी सुलभ होणार आहेत.
हे करू शकतात अर्ज
त्यामुळे यापुढे मत्स्यव्यवसाय (Fish Farming) क्षेत्राशी निगडीत कामगार, मत्स्यविक्रेते, मत्स्यसंवर्धक, मत्स्यबीज निर्मिती व्यापारी, मत्स्यखाद्य उत्पादक, मासे विक्री करणाऱ्या व्यक्ती, जाळे व होडी बनविणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यक्ती, मासे वाहतुक करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था इत्यादींनी जवळच्या सामाईक सेवा केंद्रात (CSC) आपली नोंदणी Inland Fisheries मध्ये करून घ्यावी.
हे कागदपत्रे आवश्यक
या नोंदणीसाठी चालु स्थितीतील बँक खाते, आधार कार्ड, आधाकार्डशी सलग्न मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड इत्यादी आवश्यक आहे. प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृद्धी सहयोजना (PM-MKSSY) ही सन 2023-24 ते 2026-27 या कालवाधीत केंद्रशासनामार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी एनएफडीपी या पोर्टलवर बंधनकारक आहे.
इथे साधा संपर्क
मत्स्यव्यवसाय विभागाने जिल्हास्तरावर मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्था यांची नोंदणी करण्याकरिता CSC सेंटर कार्यान्वित केले आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय नाशिक यांचे कार्यालय, जुनी अश्विनी बॅरेक क्र 06, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, नाशिकरोड नाशिक 422002 तसेच नोंदणी संदर्भात नाशिक जिल्ह्यातील CSC व्यवस्थापक पवार (मोबाईल क्रमांक 7011998133) या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेले आहे.
पीक व्यवस्थापनापासून, शेतीच्या सर्व अपडेटसाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा...