Join us

Fish Farming Tips : माशांची वाढ झपाट्याने वाढवायची आहे, असे करा खाद्य व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 20:41 IST

Fish Farming Tips : पाण्याची सुपीकता वाढविण्यासाठी मत्स्यबीज (MatsyaBeej) साठवणूकीपूर्वा खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे.

Fish Farming Tips : पाण्याची सुपीकता वाढवण्यामुळे माशांची वाढ (Fish Growth) झपाटयाने होते. यासाठीच पाण्याची सुपीकता वाढविण्यासाठी मत्स्यबीज साठवणूकीपूर्वा खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. त्यामुळे माशांचे खाद्य व्यवस्थापन कसे करावे, हे या लेखातून जाणून घेऊयात.... 

  • १० गुंठे शेततळयासाठी मत्स्यबीज (Fish Seed) साठवणूकीच्या आठ ते दहा दिवस अगोदर ५० ते १०० किलो ताजे शेण पसरुन टाकावे. नंतर दर पंधरा दिवसांनी १० ते १५ किलो शेण भिजवुन टाकावे. त्या शेणखताऐवजी बायोगॅस स्लरी वापरल्यास अतिशय उपयुक्त ठरते. बायोगॅस स्लरी ची मात्रा १० ते १५ किलो प्रति आठवडा द्यावी.
  • कोंबडीखत एक ते दोन किलो वापरावे. हे अतिशय गरम असते, यामुळे नायट्रोजनची मात्रा दोन ते तीन पटीने वाढते. 
  • मत्स्यबीज सोडण्यापूर्वी आठ दिवस अगोदर ५० किलो ताजे शेण, १ किलो युरीया, १ किलो सुपर फॉस्फेट एकत्र करुन चांगले भिजवून पसरुन टाकल्यास पाण्याची सुपीकता सर्वात उत्कृष्ठ होते व तलाव मत्स्यबीज साठवणूकीसाठी तयार होते.
  • बाजारात विविध प्रकारची मत्स्यखाद्ये उपलब्ध आहेत, परंतु त्यांची किंमत खूप असल्याने शक्यतो मक्याचे पीठ वापरावे, शेतकऱ्यांकडे मका उपलब्ध नसल्यास गिरणीमध्ये रात्री गोळा केलेले एकत्रित पीठ वापरावे, त्यामुळे खर्चात मोठी बचत होते. या पीठामध्ये सर्व धान्ये व डाळींचे मिश्रण असते. त्यात फक्त १ ते २ टक्के व्हिटॅमीन पावडर एकत्र करून द्यावी.
  • १० गुंठे क्षेत्रासाठी सुरुवातीला एक किलो पीठ +१ टक्के व्हीटॅमीन पावडर याची मात्रा द्यावी व दुस-या महिन्यापासून खाद्याचे प्रमाण ५ ते १० टक्के वाढवत जावे.  नियमापेक्षा जास्त खाद्य देवू नये, त्यामुळे पाणी खराब किंवा दुषित झाल्याने माशांची मरतुक होऊ शकते.
  • खाद्य नायलॉनच्या/शेडनेटच्या किंवा कापडाच्या पिशवीत भरुन पाण्याच्या पृष्ठभागावर ती पिशवी अर्धी बुडेल, अशी तरंगत ठेवावी. या पिशवीला नायलॉन दोरीने पाण्यात शक्यतो मध्यभागी अडकवून ठेवावे. जेणेकरुन पिशवीतील अन्न सर्व तलावात पसरते, त्यामुळे ते वाया जात नाही आणि तलावातील सर्व थरात पसरते. 

 

- सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक.

टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेतीमच्छीमार