पारंपरिक शेतीला फाटा देत आता आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. यात आधुनिक शेतीला व्यवसायाची जोड देत प्रगती साधली जात आहे. यात युवा शेतकऱ्यांचा सहभाग पाहायला मिळतो आहे. मात्र आजही अनेक युवक शेतीसोबत काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याच युवकांसाठी नाशिकच्या चांदवड येथे मत्स्य पालन व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
शेतीसोबत व्यवसाय, जोडधंदा मत्स्य पालन व्यवसाय आज शेतकरी करत आहेत. या मत्स्यपालनातून आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर चांदवड व देवळा परिसरातील अल्प भूधारक व शेततळे असलेले शेतकरी बांधव तसेच बेरोजगार युवकांसाठी थोड्या जागेत व कमीत कमी पाण्यात व कमी भांडवलात स्वतः चा उद्योग उभा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिसरातील बेरोजगार युवकांसाठी मत्स्य पालन एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून यातून नव्या रोजगाराची संधी मिळणार आहे.
दरम्यान शेततळे व कृत्रिम बायोप्लॉकमध्ये मत्स्य पालन कसे सुरु करावे? नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून ६० टक्के पर्यंत अनुदान कसे मिळवावे? मत्स्यपालनासाठी कोणत्या जाती निवडाव्यात? तयार झालेल्या माने विक्रीसाठी मार्केट कुठे शोधायचे? या उद्योगातून लाखो रुपये कसे कमवावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकदिवशीय कार्यशाळेतून मिळणारे आहेत. यासाठी महाराष्ट्र बायोप्लॉक फिश फार्मिंग नाशिक येथील मत्स्य उत्पादक सागर राऊत यांचा एक दिवसाचा प्रशिक्षण वर्ग होणार आहे.
कधी आणि कुठे होणार?
दरम्यान एकदिवशीय प्रशिक्षण वर्ग चांदवड येथे आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी गणुर चौफुली येथील शासकीय विश्रामगृह येथे स. 10 ते 2 या वेळेत या वेळेत आयोजित केलेला आहे. तरी प्रशिक्षणासाठी ज्यांना नाव नोंदवायचे असेल त्यांनी संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केले आहे.