आता पावसाळी हंगामाला (Rainy Season) सुरुवात झाली आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे किनारपट्टीवर १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत मासेमारी व्यवसायावर बंदी आहे. कोकणातील माणसांचा मुख्य व्यवसाय शेतीबरोबरच मासेमारी (fishing) हा आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. भात आणि मासे हे या भागातील लोकांचे मुख्य अन्न आहे. या प्रदेशात अन्य पिके फारशी घेतली जात नाहीत. मत्स्य विक्री, मत्स्याहाराबरोबरच अन्य सर्व गरजा मत्स्योत्पादनाशी निगडित असलेला हा वर्ग आहे. यावर्षीचा मासेमारीचा हंगाम आजपासून (१ जून) बंद होत आहे. आता दोन महिने मच्छिमारराजा आराम करणार असून नव्या हंगामाची वाट पाहणार आहे.
तरंगती जाळी, पर्सिसेन आळे, रापण, फेक जाळे, हुक आणि कॉर्डच्या स्वरूपातील जाळी वापरून मासेमारी केली जाते. त्यासाठी पारंपरिक नौकांबरोबरच यांत्रिक बोटींचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो, मासेमारीवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये हवामान हा जसा प्रमुख घटक आहे. तसाच यांत्रिक नौका आणि जाळ्यांचा वापरही महत्वाचा आहे. सरकारकडून मासेमारीला उत्तेजन दिले जात असताना यांत्रिक नौकांसाठी कर्ज उपलब्ध केले जाते. त्यातून गेल्या 25 वर्षांत मासेमारीचे चित्रच बदलते आहे. सधन मच्छिमारांनी यांत्रिक नौकर, ट्रॉलर्स खरेदी केले. त्यामुळे त्यांची मासेमारी वाढली. पारंपरिक मच्छिमार केवळ उदरनिर्वाहापुरते मासे मिळवू लागला, स्पर्धा वाढल्याने वर्षातले बाराही महिने मासेमारी केली जाऊ लागली.
मत्स्योत्पादनात घट
वास्तविक 1 जून ते 15 ऑगस्ट म्हणजे मृग नक्षत्र ते नारळी पौर्णिमा हा कालावधी माशांच्या विणीचा हंगाम असतो. त्यात मासे पकडायचे नसतात, कारण त्यांच्या प्रजननानंतर विविध प्रकारचे विपुल मासे मिळतात. वर्षभर हा पुरवठा समुद्रातून होतो. पारंपरिक मच्छिमार पावसाळ्यात हा नियम पाळतात, पण यांत्रिक नौका आणि ट्रॉलर्सचे मालक तो पाळत नाहीत. परिणामी माशांची संख्या घटत आहे. पारंपरिक मच्छिमार आणि सधन मच्छिमारांमधील संघर्षांचे हे एक कारण आहे. मत्स्योत्पादनात घट झाल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मत्स्योत्पादनात घट होण्यासाठी परप्रांतातील आणि परदेशातील यांत्रिक नौकांना समुद्रकिनारा खुला करून देण्याचे धोरण कारणीभूत आहे.
थेट निर्यातीसाठी बंदरांचा वापर
बहुराष्ट्रीय कंपन्या पर्सिसेन आळ्यांचा वापर करून खोल समुद्रात मासेमारी करत आहेत. त्या माशांवर जहाजावरच प्रक्रिया करून त्यांची परस्पर निर्यात केली जाते. पूर्वी हे मासे किनाऱ्याकडे आले की पारंपरिक मच्छिमारांची सोय होत असे आता हे मासे मिळणेच बंद झाले आहे. साहजिकच माशांची किंमत वाढून महागाई झाली आहे. कोकणात सरासरी तीन ते चार हजार मिलीमीटर पाऊस दरवर्षी कोसळतो. डोंगर माथ्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्याचे साधन कुठेही नाही. धरणांची संख्या अल्प आहे. अशा स्थितीत हे पाणी वाहून थेट समुद्रात जाऊन पडते. जाताना मोठा गाळ बरोबर नेते. त्यामुळे बंदरांमध्ये बोटी लावल्यास अनेक गोष्टींचा अडथळा निर्माण होता. माशांप्रमाणे आंबे, काजू आणि फळे व पदार्थांच्या थेट निर्यातीसाठी बंदरांचा वापर होऊ शकतो. त्यादृष्टीने बंदर विकास गरजेचा आहे. तसे प्रयत्न काही ठिकाणी सुरू आहेत. मात्र, ते अपुरे आहेत.
मासेमारी व्यवसाय नष्ट होण्याची भीतीकोकणातील मच्छिमारीवरील संकट दूर करावयाचे असेल तर मच्छिमारांची सहकारी संस्था आणि त्यांच परस्पर सामंज्यस्य सुधारावे लागणार आहे. कोकणातील मत्स्यव्यवसाय सुधारण्यासाठी किंबहुना तो वाचवण्यासाठी 'सीआरझेड' सारख्या तरतुदींचा काटेकोर अवलंब आवश्यक आहे. किनारपट्टीवर भरतीच्या रेघेपासून पाचशे मीटरपर्यंतची जागा मोकळी ठेवण्याची सूचना 'सीआरझेड' मध्ये करण्यात आली आहे. किनाऱ्यावर खारफुटी म्हणजे मॅनशुव्हज नैसर्गिकरित्या वाढल्या तर किनाऱ्याची धूप कमी होते. पर्यटनवाढीसाठी किनाऱ्यावर मोठी बांधकामे सुरू आहे. त्यावर नियंत्रण हवे आहे.
किनारी प्रदेश व्यवस्थापन (Coastal Zone Managemaent) अधिसूचनेव्दारे किनाऱ्यावर झीज आणि उंचसखलपणा, भौगोलिक रचना लक्षात घेऊन नियमन रेषा आखण्याची सूचना आहे. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत. त्यामुळे अंमलबजावणीत ढिलेपणा येतो. किनारपट्टीच्या व्यवस्थापनात सागरकिनाऱ्यावर बांधकामास आडकाठी नाही. त्यामुळे मॅनग्रव्हज, बागा, वाड्या आणि शेतांसह नजीकच्या गावांवर परिणाम होणार आहे. तर मासेमारी व्यवसाय नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे काळजी घ्यायला हवी.
- महेश सरनाईक, सिंधुदुर्ग