नंदुरबार : नवापूर तालुक्यातील (Nandurbar District) भवरे या लहानशा आदिवासी वस्तीतील शेतकरी योहान अरविंद गावित यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायातून (Fish Farming) असामान्य यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ((republic Day) दिल्ली येथे सन्मानित करण्यात येणार आहे.
गावातून दिल्लीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास भवरे या संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या गावात राहणाऱ्या योहान गावित यांनी आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबतमत्स्यपालन (Fish Farm) व्यवसाय सुरू केला. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत ६० टक्के अनुदान मिळविले. या योजनेतून त्यांना १८ पिंजरे उभारण्यासाठी ३२ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले.
योहान गावित यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर केंद्र शासन स्तरावरही झाली. राज्याचे मत्स्यव्यवसाय विभाग सहआयुक्त यांनी त्यांच्या प्रकल्पाची पाहणी करून केंद्र शासनाला सादर केलेल्या अहवालात या प्रकल्पाचे यश अधोरेखित केले. यानुसार, केंद्र शासनाने त्यांची निवड करून प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानासाठी त्यांना निमंत्रित केले आहे. तेथे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
इतर शेतकऱ्यांनाही बनविले सक्षम... मत्स्य व्यवसायातील आधुनिकता आणि सामाजिक दृष्टीकोन येथील योहान गावित यांनी मत्स्यपालन व्यवसायाला फक्त आर्थिक उपजीविकेपुरते मर्यादित ठेवले नाही, तर या व्यवसायातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम बनविले. त्यांनी आपल्या पिंजऱ्यांमध्ये मत्स्यबीज तयार करून ते शेतकऱ्यांना पुरविले. त्यांच्या या कामामुळे भवरे गाव व परिसरातील अनेक शेतकरी मत्स्य व्यवसायाकडे वळले असून, आपली आर्थिक स्थिती सुधारत आहेत.
आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण... पोस्ट विभागाचे निरीक्षक भरत चौधरी आणि पोस्टमन सुनील गावित यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानाचे औपचारिक आमंत्रण योहान गावित यांना सुपुर्द केले. हे आमंत्रण स्वीकारताना योहान गावित आणि त्यांच्या पत्नी यशोदा गावित यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. "हे आमच्यासाठी फक्त सन्मान नाही, तर आमच्या गावासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. शासनाच्या अनुदानाचा योग्य वापर करून व्यवसाय उभारता येतो आणि कुटुंबाचा आर्थिक विकास साधता येतो, हे आम्ही सिद्ध केले," असे भावनिक उदगार त्यांनी काढले.