नदी प्रदूषण, मासे न पकडण्याची चुकीची पध्दत व परदेशी माशांचे अतिक्रमण यामुळे कडवी, कासारी नदीच्या जलस्त्रोतांतील तेरा स्थानिक माशांच्या प्रजाती नष्ट होत असल्याने जलचक्रातील अन्नसाखळी विस्कळीत झाली आहे. या प्रजातीचे मत्स्य बीज संवर्धनाची मोहीम येथील वसुंधरा निसर्ग संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माळी यांनी हाती घेवून सलग तीन पावसाळ्यात दोन लाख स्थानिक माशांच्या बीजांचे संवर्धन केले आहे. तळ्यात मत्स्य बीज संर्वधीत करणारा अनोखा उपक्रम हाती घेवून कडवी जलस्त्रोताच्या संवर्धनाची एक बाजू त्यांनी लावून धरली आहे.
कडवी व कासारी नदीतील मळवे (गारामुली), दांडी किंवा आमाळी (डायनोराजबोरा), शिप्रण, कटला, वाम, पादा, मरळ, शेंगाळी, घ्या, कानस, महाशिर, कोळस, भेक आदी प्रजाती झपाट्याने कमी होत आहेत. या कारणांचा शोध घेताना प्रामुख्याने चुकीच्या पध्दतीची मासेमारी समोर आली.
शाक ट्रीटमेंट: पाण्यामध्ये विज प्रवाह सोडून मासेमारी. ही पध्दत जीवघेणी ठरलेली उदाहरणे आहेत.
स्फोटक (जिलेटीन) : सुरूंगाव्दारे पाण्यात स्फोट घडवून त्यांच्या धक्क्याने मासा मारणे. ही पध्दतही जिवावर बेतू शकते.
ब्लेचिंग पावडर : नदीच्या उथळ प्रवाहामध्ये ब्लेचिंग पावडर टाकून प्रवाहात पुढे एक किलो मीटर जाळी बांधून मासे पकडले जातात. ही पध्दत स्लो पॉईजनसारखे काम करते. अशा पध्दतीने मारलेले मासे आरोग्यास गंभीर ठरतात. त्वचा काळी पडण्यापासून ते आतड्याचा कॅन्सरपर्यंत धोका उद्भवतो. या तिन्ही पध्दतीची मासेमारी कायद्याने गुन्हा आहे. मात्र हे सर्व प्रकार दुर्गम भागात व रात्रीचे चोरीने होतात.
चढणीची मासे पकडणे : नैसर्गिकपणे अंडी घालण्यासाठी मासे पावसाळ्यात प्रवाहाच्या विरोधात चढायला लागतात. जेणेकरून आपली वंशावळ टिकावी म्हणून नदीच्या मुखाशी धावतात. हीच संधी समजून पोटात लाखो अंडी असलेले मासे पकडले जातात. साधारण कार्प प्रजाती मधील पाच किलोची एक मादी या काळात मारली तर तिच्या पोटातील दीड ते दोन लाख अंडी पैदास रोखतो. तेव्हा ही पध्दत जीवनचक्र विस्कळीत करणारी आहे.
परदेशी माशांचे अतिक्रमण: तिलापिया (चिलापी, किलाप), पंग्यासिस (पानगा, टाकळी) पाकू रूपचंदा, मांगूर यासारखे परदेशी मासे आपल्या जलाशयात समाविष्ट होताना स्थानिक प्रजातीवर अतिक्रमण करते. या प्रजातींचा विनिचा विशिष्ट हंगाम नाही. साहजिकच वर्षभर अंडी दिली जातात. मादी अंड्याचे व पिल्यांचे रक्षण करण्यास सज्ज असते. त्यामुळे घातलेल्या अंड्यापैकी नव्वद टक्के अंडी जगतात, तसेच हा मासा त्या जलसाठ्यातील स्थानिक माशांची अंडी खाणे, पिल्ले खाणे व खाद्य ही संपवतो, तर दुसरीकडे स्थानिक मासे वर्षातून एकदाच पावसाळ्यात अंडी देतात. अंडी व पिलांना निसर्गाच्या स्वाधीन करते त्यामुळे या पिल्लांची जगण्याची टक्केवारी पंधरा ते वीस टक्के अशी अल्प राहते. एका बाजूला परदेशी माशांची होणारी झपाट्याने वाढ तर स्थानिक माशांची संख्या घटताना दिसते.
स्थानिक प्रजातीच्या संवर्धनासाठी ही मोहीम हाती घेवून, जेव्हा स्थानिक लोक रात्रीच्या वेळी चढणीचे मासे पकडण्यासाठी फिरत असतात तेव्हा त्यांच्यासोबत फिरून मारलेला मासा तात्पुरता त्यांच्याकडून घेतला जात. मादीच्या पोटात अंडी तयार असतील तर अशी अंडी काढून घेतली जातात व मासा परत दिला जातो. त्याच प्रजातीचा नर पुढील पाच ते सात मिनिटात सापडला तर त्याच्या पोटातील सिमेंट (वीर्य) काढून घेऊन ती अंडी फलित केली जातात व घरी आजून उबवली जातात.
ही अंडी उबवण्यासाठी माळी यांनी अनेक प्रयोग केले व कमीत कमी संसाधनात घरच्या घरी कशी अंडी उबवली जातील याचा अभ्यास करून ही अंडी उबवण्यात यश मिळवले. या अंडातून तयार झालेली पिले बोटाएवढी मोठी झाल्यानंतर ती ज्या ठिकाणी त्या पिलांचे आईबाप पकडले गेले त्याच ठिकाणी नेऊन सोडली जातात अशा पद्धतीने जी अंडी तव्यामध्ये भाजली जाणार होती त्या अंड्यातून पिलं तयार करून पुन्हा तळ्यात, नदीपात्रात सोडली जात आहेत.
यावर्षी मासेमारी करणान्यांपैकी कॅभुर्णेवाडीतील विश्वास जाधव व कोडोली येथील अविनाश गोसावी है। दोन युवक या मोहिमेकडे वळले असून विश्वास जाधव यांनी दोन हजार तर अविनाश गोसावी यांनी दहा हजार पिल्ले तयार करून नदी पात्रात सोडली आहेत.
- आर. एस. लाड (लेखक लोकमतचे आंबा येथील वार्ताहर आहेत)
शासनाकडून जर स्थानिक मत्स्यबीज केंद्रे उभारली गेली तर येथील जलीय जैवविविधता टिकवून, मत्स्य व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देता येतील.-संजय वाटेगावकर, सह आयुक्त, मत्स्य विभाग, नाशिक