Join us

कटला मासा खवैय्यांमध्ये लोकप्रिय,मच्छीमारांना संगोपनातून करता येणार कमाई...

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 17, 2024 2:00 PM

गोड पाण्यात वाढणारा या माशाला जागतिक बाजारातही मोठी मागणी..

पशुपालनासोबत भारतातील शेतकरी मत्स्यपालनही मोठ्या प्रमाणावर करतात. अनेक राज्यांमध्ये मत्स्यशेतीसाठी सरकार अनुदानही देते. परंतू अनेक शेतकऱ्यांना अनुदानावर तलाव बांधल्यानंतरही कोणत्या जातीचे मासे पाळावे हे ठरवता येत नाही. जेणेकरून आपण कमी वेळेत आणि कमी खर्चात आपण अधिकाधिक कमाई करू शकतो. जर तुम्हीही मत्स्यपालनाचा विचार करत असाल आणि त्याच्या प्रजातींविषयी संभ्रमात असाल तर आता काळजीचे कारण नाही. या माशांच्या प्रजातींच्या संगोपनातून आर्थिकदृष्ट्याही अनेक संधी आहेत.

जागतिक बाजारपेठेत लोकप्रीय

मांसाहार करणाऱ्या खवैय्यांमध्ये कटला माशाला मोठी मागणी आहे. महाराष्ट्रात या माशाला तांबराही म्हटले जाते. गोड्या पाण्यात राहणारा असल्याने या माशाची चवही चांगली असल्याचे सांगितले जाते. कृष्णा नदीच्या दक्षिणेस पूर्वी दूर्मिळ समजला जाणारा हा मासा भारतीय व जागतिक बाजारपेठेत नावाजला आहे. 

बाजारात हा मासा लोकप्रिय तर आहेच पण एका वर्षात साधारण दीड किलोपेक्षा अधिक वजन वाढवतो, अशी याची खासीयत आहे. इतर माशांपेक्षा वेगाने वाढणारा हा मासा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या माशाचे पालन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. 

२५ ते ३२ अंश तापमानात होते चांगली वाढ

कटला मासा तसा भातशेती असणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणावर हा मासा सापडतो. या माशासाठी २५ ते ३२ अंश तापमान चांगले मानले जाते. उष्णकटिबंधीय प्रातांतील तलावांमध्ये या माशाचे संगोपन करण्यास सुरुवात केल्यास मच्छिमारांना चांगला बाजारभाव मिळू शकतो. गोड आणि स्वच्छ पाण्यात वाढणारा हा मासा आहे. त्यामुळे तलावात किंवा विहिरीतही याचे पालन करणे शक्य आहे.

कटला माशाचे खाद्य काय?

तलावाच्या वरच्या थरातील अन्न हा मासा खात असल्याने इतर मत्स्य जातींबरोबर खाद्यासाठी या माशाची स्पर्धा नसते. त्यामुळेच त्याची वाढ ही इतर माशांच्या तुलनेत अधिक दिसते. या माशाला किटक खायला आवडतात. या  माशाचे मत्स्यबीजही बाजारात सहज मिळणे शक्य आहे. मत्स्यपालन सुरु केल्यानंतर साधारण ६ ते ८ महिन्यात या माशाची वाढ होते.

टॅग्स :मच्छीमारव्यवसाय