महिन्यांपासून बंद असलेल्या पर्ससीननेट मासेमारीला १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. मात्र, वादळी वारे आणि उसळणाऱ्या लाटांचा सामना करत पर्ससीन नौकांना खोल समुद्रातील मासेमारीचा शुभारंभ करावा लागणार आहे.
जिल्ह्यात २८७ पर्ससीननेटच्या नौका असून, या नौका मासेमारीसाठी समुद्रात जाणार आहेत. खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरुवात होते, तर पर्ससीननेट मासेमारीला १ सप्टेंबरपासून सुरुवात होते.
आठ महिन्यांच्या कालावधीनंतर पर्ससीननेट मासेमारीला सुरुवात होणार आहे. गतवर्षी सततच्या वातावरणातील बदलामुळे पर्ससीन मासेमारी अनेकदा बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे पर्ससीननेट नौका मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
खोल समुद्रातील मासेमारी सुरू झाली असली तरी पावसामुळे समुद्राला आलेले उधाण, समुद्रामध्ये उसळलेल्या अजस्र लाटा आणि सोसाट्याचा वारा, अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना करावा लागत आहे.
या परिस्थितीमध्ये पर्ससीननेट वगळता इतर यांत्रिकी होड्या, बिगर यांत्रिकी नौका नव्या हंगामात मासेमारी सुरू झाली आहे. अजनही पावसाळी वातावरण असून, समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे पर्ससीननेट मासेमारीला समुद्रातील वातावरणाचा सामना करतच हंगामाला सुरुवात करावी लागणार आहे.
नौका मालक खलाशांच्या प्रतीक्षेतस्थानिक खलाशी मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ व अन्य राज्यातील खलाशांना बोलावण्यात येते. मागील पाच-सहा वर्षापासून पर्ससीन नौका वाढल्याने खलाशांची संख्याही वाढली आहे. एका पर्ससीननेट नौकेवर २५ ते ३० खलाशांची संख्या असते. मात्र, आता नेपाळी लोकही खलाशी म्हणून काम करतात. मात्र, अजूनही पुरेसे खलाशी न मिळाल्याने नौका मालक खलाशांच्या प्रतीक्षेत आहेत.
दलालांकडून केला जातो खलाशांचा पुरवठापर्ससीननेट नौकामालकांना कायमच खलाशांची कमतरता भासते. खलाशी वेळेत मिळाले नाहीत तर पर्ससीननेट नौका नांगरावर बंदरातच उभ्या ठेवाव्या लागतात. त्यामुळे नौकामालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होते, त्यामुळे खलाशासाठी नौकामालकांना दलालांची मदत घ्यावी लागते. दलालांना आगाऊ रक्कम देऊन खलाशी बोलावले जातात.