अनादी काळापासून माशांवर मानवी जीवन अवलंबून आहे. विष्णू अवतारातसुद्धा मत्स्य अवताराला फार महत्त्व दिले गेले आहे. पुराण काळापासून अनेक अद्भुत घटना मासे राहात असलेल्या अथांग अशा समुद्रात घडलेल्या आहेत. समुद्र आणि नदीतील मासे पकडताना हजारो मच्छीमारांना मरण पत्करावे लागले आहे, किंबहुना मरण पत्करावे लागत आहे. मासेमारीच्या हव्यासापोटी अनेक मच्छीमारांना वेगवेगळ्या आजारपणांना अथवा संकटांना तोंड द्यावे लागले आहे. मासे मारताना समुद्रात अचानक घडणाऱ्या विचित्र घटनांनी मच्छीमार उदध्वस्त झालेला आहे.
समुद्रात किंवा नदीमध्ये जिवंत माशांचा जीव घेण्याअगोदर ज्या समुद्रात मासे आपल्याच आनंदात खेळत असतात, बागडत असतात, मुक्त अन् स्वच्छंदपणे विहरत असतात त्यांना मरण्यापूर्वी दर्याच्या राजाला साकडे घालावे लागते. त्याची आणि समुद्रातील अदृश्य अशा मालकी शक्तीची पूर्व परवानगी घेऊन मच्छीमारी करावी लागते. हे कुठेही लिखित नियम नसतात, परंतु मासे खाणाऱ्यांना याची सुतराम कल्पना नसते. एवढ्या मोठ्या समुद्रात मासांना काय तोटा? एक एक मासा एकाच वेळी हजारों अंडी घालत असतो. त्यामुळे त्यांची उत्पत्ती कधीही कमी होणारच नाही अशी आमच्या सुपीक डोक्यातील कल्पना असते.
बडे यांत्रिकी मच्छीमार समुद्राच्या तळापासून मोठमोठी जाळी टाकून माशांची अत्यंत छोटी छोटी प्रजात नष्ट करीत आहेत. त्यातच आता सरकारने चौपन्न प्रकारचे किमान कायदेशीर आकारमान निश्चित केले आहे. परिणामी असे निर्बंध घातलेल्या आकारमानापेक्षा लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्यांची खरेदी-विक्री करणे बंद करावे लागणार आहे, महाराष्ट्र शासनाच्या राज्य सल्लागार व संनियंत्रण समितीने वाणिज्यदृष्ट्या महत्वाच्या ५४ माशांच्या जातींचे आकारमान निश्चित केले आहे. त्यामध्ये सुरमई, सरंगा, पापलेट, बांगडा, कोळंबी, खेकडा, बोंबील अशा आपल्या नेहमीच्या खाण्यातील आणि मासे खवय्यांच्या ताटातील माशांचा समावेश आहे.
अधिक वाचा: अपरिपक्व मासा पकडणे, खरेदी-विक्रीवर निर्बंध
गेली काही वर्षे राज्यातील जलधी क्षेत्रात अत्याधुनिक यांत्रिकी नौका व बारीक छिद्र असलेल्या जाळ्यांद्वारे खोलवर मासेमारी केली जाऊ लागली आणि त्यावेळेपासून अत्यंत कमी आकारमानाची मासेमारी केली जाऊ लागली. परिणामी माशांची अत्यंत लहान लहान बीजे नष्ट होऊ लागली, मासळी बाजारात आपण पूर्वी कधीही न पाहिलेली पापलेट, सरंगा, सुरमई यांची ३ ते ४ इंचांची पोरे विक्रीसाठी येऊ लागली, छोट्या मोठ्या मच्छीमारांना अनेक वेळा मासे मिळत नसल्यामुळे समुद्रातून परत यावे लागत आहे.
दुसरी बाजू म्हणजे मासे खाणाऱ्या खवय्यांच्या संख्येत झालेली मोठी वाढ. त्याचबरोबर मासेमारी धंद्यात आता जास्त पैसा मिळतो म्हणून गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक आणि एकंदरीत राज्याच्या मच्छीमारी क्षेत्रात पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात ट्रॉलर, पाती, बोटी आणि इतर प्रकारची मासेमारी मोठ्या प्रमाणात होऊ लागली. मोठ्या प्रमाणावरील अवैध मासेमारी अशा सर्व प्रकारांची दखल घेऊन सरकारने लहान आकारमानाचे मासे मारण्यावर आणि ते खाणान्यांतर कागदोपत्री बंधने घातली असली तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी कशी होणार? मासे खरेदी-विभिवर आणि खवय्यांवर बंधन कसे घालणार? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत राहतात. कारण तेवढी सक्षम यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाही.
तिसरी बाजू म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मासेमारीच्या वेळी एकाच वेळी फक्त पापलेट किंवा सरंगा मिळेल असे नाही. त्या जाळ्यात विविध प्रकारचे मासे मिळत असतात, त्यावेळी शासनाने दिलेल्या आकारमानाचे मासे बाजूला कसे काढायचे? त्यातील लहान मासे बाजूला काढून पुन्हा पाण्यात टाकायचे कसे? खरेदी-विक्री करताना मोजपट्टी घेऊन प्रत्येक मासा मिमीमध्ये मोजायचा कसा? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. याविषयी अधिक संशोधन आणि चर्चा करून लहान मासे वाचवण्याची मोहीम हाती घ्यावी लागेल, तरच भविष्यात खवय्यांना मोठे मासे खायला मिळू शकतील.
चंद्रशेखर उपरकर
लेखक शिवाई पर्यटन कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष आहेत