मधुकर ठाकूर
उरण : किलोला १६०० ते १८०० रुपये मिळवून देणारी शेवंड (लॉबस्टर) ही मासळी स्थानिक व पारंपरिक मच्छीमारांना चांगला फायदा देणारी ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ती अल्प प्रमाणात सापडत असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले.
आखाती देशात या मासळीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. दिवसाला चारशे ते पाचशे किलोपर्यंत विक्री होते. मात्र सध्या बाजारात ती मिळत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
जगभरातील सर्वच समुद्रांत शेवंड आढळतात. खडकाळ, वाळूमय किंवा गढूळ पाण्यात तसेच खोल समुद्रातही शेवंड सापडते. स्थानिक मच्छीमार छोट्या होड्यांनी शेवंड मासळी पकडतात.
एक नंबर प्रकारात मोडणाऱ्या शेवंडीचे वजन ३०० ते १५०० ग्रॅम भरते. त्याला १६०० ते १८०० रुपये प्रति किलो दराने घाऊक बाजारात विक्री होते.
तर दोन नंबर प्रकारात मोडणारी शेवंड १०० ते २५० ग्रॅम वजनाची असून प्रति किलो ११०० ते १२०० रुपये भाव मिळतो.
गुजरात, अलिबाग, वरळी, मुरुड, श्रीवर्धन, रेवदंडा येथून दररोज सुमारे ४५० ते ५०० किलो शेवंड विक्रीसाठी येत असते. मात्र सध्या हे प्रमाण खूप कमी झाले आहे.
मच्छीमारांकडूनही मागणीप्रमाणे शेवंडींचा पुरवठा होत नाही. त्यामुळे मागणी असूनही निर्यात कंपन्यांना पुरवठा करणे शक्य होत नाही. - आसिफ शेखानी, घाऊक व्यापारी, कसारा
दिवसाकाठी एक-दोन किलो शेवंड मिळाल्यास स्थानिक मच्छीमारांसाठी शेवंडीचा व्यवसाय अत्यंत फायदेशीर ठरतो. मात्र सध्या समुद्रात शेवंड मिळण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. - उमेश कोळी, मच्छीमार, उरण