मुंबईच्या बाजारात दिसणाऱ्या चकचकीत सिल्व्हर पापलेटला आता राज्य माशाचा दर्जा मिळाला आहे. या जातीच्या माशाचे संवर्धन व्हावे आणि त्याची पैदास वाढावी, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या विषयीची घोषणा मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या सातपाटी किनारा भागात मोठ्या प्रमाणात सिल्व्हर पापलेट आढळते. या पापलेटची मोठ्या प्रमाणावर निर्यात होऊन यातून परकीय चलनही देशाला मिळते. सिल्व्हर पापलेटला स्थानिक पातळीवर पापलेट किंवा सरंगा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्य मत्स्य विभागाने सिल्व्हर पापलेटचे महत्त्व जाणून टपाल तिकीट ही जारी केले आहे.
राज्यमासा दर्जा मिळाल्याने काय होणार?या माशाची मोठ्या प्रमाणावर पैदास असणाऱ्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या मासेमारी पद्धतीत बदल करून, माशांची पैदास मोठ्या प्रमाणावर कशी होईल, याकडे लक्ष दिले जाईल. विशेषतः पर्सेसीन जाळ्यांनी केल्या जाणाऱ्या मासेमारीवर या भागात आळा घातला जाईल. यामुळे या माशांची मादी आणि लहान पिलांचे संवर्धन होऊन माशांची पैदास वाढण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
उत्पादनात घटमहाराष्ट्रात १९८० पासून सिल्वर पापलेटचे उत्पादन कमी होत चालले आहे. पापलेटचे सरासरी वार्षिक उत्पादन १९६२-१९७६ दरम्यान ८,३२२ टन, १९९९-२००० दरम्यान ६,५९२ टन आणि २००१ - २०१० दरम्यान ४,४४५ टन आणि २०१०-२०१८ मध्ये ४,१५४ टन पापलेट उत्पादन झाले आहे.