सिल्लोड तालुक्यातील पूर्णानदी, खेळणा, खडक पूर्णा, नेवपूर मध्यम प्रकल्पात जैवविविधतेस हानिकारक व स्थानिक माशांचा कर्दनकाळ असलेल्या जिलेबी माशांचे प्रमाण वाढल्याने स्थानिक प्रजातींच्या माशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
जिलेबी मासा हा एक विदेशी, आक्रमक व जैवविविधतेस हानिकारक असा मासा आहे. सिल्लोड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या पूर्णा नदीवरील नेवपूर व खडकपूर्णा या दोन धरणांमध्ये जिलेबी हा मासा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आढळत आहे. यामुळे खवल, बोराई व आरोळ या जातीचे मासे या भागातून जवळपास नामशेष झाले आहेत. जिलेबी हा मासा मूळचा आफ्रिकेतील मोझम्बिया येथील असल्याने याचे शास्त्रीय नाव 'तिलापिया मोझेम्बिका' आहे. यास तिलपी व दक्षिण भारतात जिलपी असे म्हटले जाते. जिलपीचा अपभ्रंश होऊन 'जिलेबी' हा शब्द बनला.
१९५२ मध्ये एका विशेष कराराद्वारे सदर मत्सबीज देशात आले, ते केवळ बंदिस्त जागेत उत्पादन घेतले जाण्याच्या अटीवर: मात्र या अटींचा भंग झाला व हा मासा सर्वत्र फोफावला. याबद्दल चिंतेचे कारण म्हणजे हा मासा अत्यंत खादाड असून तो देशी गावरान प्रजातीच्या माशांची अंडी खाऊन टाकतो. यामुळे स्थानिक मासे प्रजाती आता जवळपास नष्टच झाल्या आहेत. सध्या सर्वच जलाशयांत स्थानिक मासे व विदेशी मासे यांचे प्रमाण एकास दहा आहे.
जिलेबी tilapia माशांची आठवड्याला १२०० ते १५०० अंडे देण्याची क्षमता
- जिलबी १०० ग्राम वजनाची मादी आठवड्यात १०० अंडी घालते तर ५०० ग्राम वजनाची मादी १२०० ते १५०० अंडी आठवड्यात घालते. अवघ्या ६ आठवड्यांत जिलेबी मासे प्रजननक्षम बनतात.
- जर हे १० मासे पाण्यात सोडले तर दीड महिन्यात ही संख्या ११०० होते व याच गतीने या १०० चे पुढील ३ महिन्यांत १६ हजार इतकी संख्या होते. या माशांमुळे जलवनस्पतीवर आधारित सजीव जलसृष्टीही धोक्यात आली आहे.
विदेशी प्रजातींच्या उच्चाटनासाठी संतोष पाटील यांनी घेतला पुढाकार
जिलेबी या विदेशी माशांमुळे लालपरी, कट्यार, चाल, मूह, झिरमोटी, वाम, गेर, पाबदा, मरळ, डेबर, मुरळी, डोख, बोराई, आरोळ, भंगणा, खवल, बळो, बोराई, मुरळी आदी स्थानिक मासे नामशेष होताना दिसत आहेत. सदरील हानिकारक विदेशी प्रजातींचे येथील जलसाठ्यातून उच्चाटन करून स्वदेशी मासे विकसित करावेत, यासाठी पर्यावरण अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी राज्य सरकारला पत्र दिले आहे.