अलिबाग : तीन महिन्यांपासून वातावरणात गारवा असल्याने समुद्रात मासे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय तोट्यात आहे.
साखर, आक्षी, नवगाव, रेवस येथील मच्छीमारांनी पर्याय म्हणून फायद्याच्या शेवंड्या आणि खेकडे (चिंबोऱ्या) पकडण्याकडे मोर्चा वळविला आहे.
हिवाळा हा मच्छीमारांसाठी तोट्याचा हंगाम ठरतो. यंदाही अशीच परिस्थिती आहे. अन्य हंगामात पाच दिवसांच्या समुद्रातील एका फेरीसाठी मोठ्या बोटीच्या मालकाला सुमारे ५० हजार रुपयांचा फायदा होतो. तो आता कमी तरी झाला आहे किंवा तोट्यात आहे.
त्यामुळे शेवंड या कोळंबीसारख्या माशाला पकडण्याकडे कल आहे. शेवंडीला पंचतारांकित हॉटेल्समध्ये मागणी आहे. तिला बाजारात १२०० रुपये किलोचा दर आहे.
तर समुद्रातील मोठे खेकडेही निर्यात होत असून दीड ते दोन किलो वजनाच्या खेकड्यांचीही निर्यात परदेशात केली जाते. मासळी खरेदी करून ती मुंबईत निर्यातदारांकडे दिली जाते.
त्यानंतर ही मासळी सिंगापूर तसेच इतर देशांतील पंचतारांकित हॉटेलांसाठी पुरविण्यात येत असल्याची माहिती खरेदीदारांनी दिली.
अलिबागमधील रेवस बंदरावर या माशांची खरेदी केली जाते. त्यानंतर या शेवंडची परदेशात निर्यात केली जात असल्याची माहिती या व्यवसाय करणारे राजू बानकर यांनी दिली.
हा व्यवसाय आपण मागील दहा ते बारा वर्षांपासून करीत असल्याचीही माहिती दिली, तर या मासळीचा व्यवहार बंदरावरच होत असून पैसेही ताबडतोब मिळतात. आम्ही हीच मासळी पकडण्याचे काम करतो.
सध्या मासळीची टंचाई जाणवत असल्याने मच्छीमार सध्या खेकडी व शेवंड्यांची मासेमारी करीत असल्याची माहिती मच्छीमार सतीश नाखवा यांनी दिली.
अधिक वाचा: मत्स्यपालन करताय? कमी कालावधीत अधिक वजन देणारा हा मासा ठरतोय फायदेशीर