वैभव गायकरपनवेल : पनवेलमधील ब्रिटिशकाळात स्थापन झालेल्या खार जमीन संशोधन केंद्राच्या फिश फीडर डिव्हाइसला नव्याने पेटंट मिळाल्याने अशाप्रकारचे पेटंट मिळालेले डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे भारतातील एकमेव असे विद्यापीठ आहे.
मत्स्यशेती करत असताना माशांना जे खाद्य टाकले जाते ते खाद्य पाण्यात काही कालांतराने तळाशी जाऊन कुजते. यामुळे पाण्याच्या दर्जावर परिणाम होतो त्याचाच विपरीत परिणाम मत्स्यबीजांवर होतो. हे डिव्हाइस विकसित करण्यासाठी मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. विवेक रोहिदास वर्तक व त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ यांनी विशेष मेहनत घेतली.
फिश फीडर हे वापरायला सोपे असून कमी खर्चिक असल्याने यांच्या वापराने खाद्य तलावात बाहेर फुकट न जाता खाद्याचा अपव्यय वाचणार आहे. माशांच्या गरजेप्रमाणे मत्स्य खाद्य मिळाल्याने माशांची वाढ चांगली होऊन ढासळणारी पाण्याची गुणवता उत्तम राहण्यास मदत होणार आहे.
लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध- लवकरच या फीडरला व्यवसायिक स्वरूपावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी खार जमीन संशोधन केंद्र प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. वर्तक यांनी केले.- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी व मत्स्यविषयक संशोधनात संशोधन केंद्रांचा वाटा हा महत्त्वाचा असून त्या अनुषंगाने सर्व शास्त्रज्ञ वर्गाने जिवंत मत्स्य वाहतूक सुविधा, मत्स्य प्रयोगशाळा, मत्स्य पिंजरा प्रकल्प सुविधांचा वापर करून संबंधित संशोधनात आपले शंभर टक्के योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथे केले.
सात वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा २०१७ साली आम्ही हे डिव्हाइस पेटंटसाठी केंद्राकडे सादर केले होते. त्यानंतर या डिव्हाइसची तुलना अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या डिव्हाइससोबत झाली होती. आमच्या संशोधनातील वेगळेपणा आम्ही दाखविल्यानंतर पेटंट रजिस्टर कार्यालयाकडून आम्हाला हिरवा झेंडा मिळाल्याने आमच्या परिश्रमाला यश आले असल्याचे डॉ. अभय वर्तक यांनी सांगितले.