जुलै महिना उजाडला तरी पावसाने दडी मारल्याने औंधसह परिसरात पेरण्या खोळंबल्या आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. डोंगरावर अजून हिरवळ नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आडसाली ऊस विकत घेऊन जनावरांना घालण्याची वेळ पशुपालकांवर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे माण तालुक्यातील पळशी, मार्डी, मोहीसह परिसरात गेल्या महिनाभरापासून पाऊस लांबल्याने तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. पशुपालक शेतकरी अडचणीत आले आहेत. गतवर्षी साठवलेला सुका चारा संपत आला असून, आसपासच्या परिसरात चारा शोधण्यासाठी पशुपालक धडपडत असल्याचे दिसत आहे. मात्र चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शेतकरी वर्ग शेताच्या मेहनती पूर्ण करून पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत. पावसाच्या जिवावर अवलंबून असणारे शेतकरी चिंतातुर आहेत. बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. शेतीच्या पाण्याची मोठी कमतरता भासू लागली आहे.
जून महिना संपूनही अद्यापही पाऊस झाला नसल्याने जनावरांचे हाल सुरू झाले आहेत. परिसरात अनेक शेतकऱ्यांनी शेतीला आधार म्हणून कर्ज काढून गायी विकत घेतल्या आहेत. पशुपालकांना ओला चारा अव्वाच्या सव्वा दराने विकत घ्यावा लागत आहे. पाऊस पडला नसल्याने सध्या ऊस पंचेचाळीस रुपये किलो दराने तर कडवळ ४ हजार रुपये प्रतिगुंठा दराने विकत घ्यावे लागत आहे. पाऊस पडला नाही तर चाऱ्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडला नाही तर पशुपालकांना पशुधन सांभाळणे वाळून गेल्याने जनावरे जगवायची अवघड होणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान औंध परिसरातील उरमोडी कॅनॉलचे पाणी येथील काही भागाला मिळत होते. त्यामुळे त्या ठिकाणी काही अंशी दिलासा होता मात्र रविवारी तेही कॅनॉलचे पाणी बंद झाल्याने शेतकरी निराश झाला आहे. येथील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा खरीप हंगाम असून नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. बटाटा, कांदा पिके घेऊन त्यावर वार्षिक आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्यासाठी शेतकरी वर्ग प्रयत्नशील असतो, मात्र पुरेशा पावसाअभावी चारा अजूनही पाऊस नसल्याने पिके करायची कशी, बँकांची कर्जे फेडायची कुठे हिंडवायच्या असा प्रश्न कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माण परिसरात गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई भासत असून, टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. विहिरींनी केव्हाच तळ गाठला असून ओढे, नाले, तळी, तलाव कोरडे ठाक पडले आहेत. पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊसच नसल्याने मजुरी मिळत नसल्याने शेतमजुरांचे हाल सुरू झाले आहेत. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे.