कोंबड्यांमध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य व परोपजीवी रोगापासून होणारे आजार बघावयास मिळतात. यामुळे कोबड्यांची विशेष काळजी घेणे अनिवार्य असते, जेणेकरून ते आजारी पडू नयेत व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये.
पावसाळ्यामध्ये वातावरणात असलेली आर्द्रता व अनेक जीवजंतूच्या वाढीसाठी उपयुक्त वातावरण असल्यामुळे त्यांचा जीवनक्रम कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊन ते झपाट्याने वाढतात. यामुळे पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते.
मुख्यतः जंतू किंवा परोपजीवी पक्षांच्या खाद्यात, पाण्यात, विष्ठा किंवा कोंबड्यांच्या घरात आढळून येतात व वातावरण अनुकुल झाल्यास ते जलद गतीने वाढून पक्षी आजारी पडतात.
देवी रोग
कारणे आणि प्रसार
• विषाणूजन्य कोणत्याही वयोगटातील पक्षांना होतो.
• रोग डासांमुळे तसेच इतर रक्त शोषण करणाऱ्या बाह्य परोपजीवीमुळे पसरून पक्षांना त्याची लागण होते.
• पावसाळ्यामध्ये डासांची प्रजनन क्षमता व वाढीसाठी अनुकुल वातावरण असल्यामुळे डासांची संख्या वाढल्याकारणाने हा रोग लवकर पसरतो.
लक्षणे
• पक्षांची त्वचा, श्वसन प्रणाली प्रभावीत होते.
• त्वचेवर खपल्या येतात. खपल्या मुख्यत्वे चेहरा, तुरा व पायावर येतात.
• पक्षांचे डोळेपण खपल्यांमुळे सुजतात त्यांना अंधत्व येऊ शकते.
• खपल्या श्वसन व अन्न नलिकेत होतात. त्यामुळे खाद्य खाण्याचे प्रमाण खूप कमी होते व वास घेण्यास त्रास होतो.
• पक्षी कमजोर होतात व त्यांचे वजन वाढत नाही.
• नाकातून स्त्राव वाहतो व मरतुक सुद्धा होऊ शकते.
उपाय
• लसीकरण हाच उपाय, देवी रोगावरील फाऊल पॉक्स लस लॅन्सेटच्या सहाय्याने द्यावी.
• एका पक्षास रोग झाल्यानंतर इतर पक्षी रोगास बळी पडू नये याकरिता ३ दिवस पक्ष्यांना प्रतीजैविक औषध पाण्यातून द्यावे.
• व्हिटॅमिन ई १० ग्रॅम प्रती १०० पक्ष्यांना द्यावी जेणेकरून पक्ष्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
• शेडमध्ये प्रतीविषाणूजन्य औषध बी ९०४ ३ ते ५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.