Fruit Collection Centre : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात कमी पावसामुळे दुष्काळी फळपिकांची शेती प्रामुख्याने केली जाते. येथे अंजीर आणि सिताफळ ही फळपीके मुख्य असून भाजीपाला पिके आणि वाटाण्याचे पिक घेतले जाते. पण येथील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत मागील काही वर्षांपासून फळे संकलन केंद्र सुरू केले असून उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण केले आहेत.
दरम्यान, कमी पाऊस पडणाऱ्या पुरंदर तालुक्यामध्ये अंजीर व सीताफळ ही प्रामुख्याने फळ पिके घेतली जातात. येथील अंजिराला भौगोलिक मानांकन असल्यामुळे याची वेगळी ओळख आहे. तर येथील फुले पुरंदर या सिताफळाचे वाण प्रसिद्ध आहे. त्यामुळे या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया उद्योगाची आणि संकलन केंद्राची निर्मिती झाली आहे. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीकडून संकलन केंद्र चालू करण्यात येऊ शकते.
शेतकऱ्यांना फायदा
फळे किंवा शेतमाल संकलन केंद्र ग्रामीण भागात सुरू केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत घेऊन जाण्याची गरज नसते. संकलन केंद्रावरही चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचतो. त्याचबरोबर संकलन केंद्रावरून माल थेट सुपर मार्केट किंवा निर्यात होत असल्यामुळे मालाला चांगला दर मिळण्याची खात्री असते.
कशी केली जाते खरेदी?
संकलन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल थेट खरेदी केला जातो. वजनानुसार शेतकऱ्यांना मालाचे पैसे रोखीने दिले जातात. त्यानंतर या मालाची प्रतवारी केली जाते. वजनानुसार आणि समोरून ग्राहकांच्या मागणीनुसार ही प्रतवारी केली जाते. त्यानंतर या फळांची नीट पॅकिंग करून, फोम लावून बॉक्समध्ये भरले जातात. त्यानंतर मागणीनुसार ज्या त्या ठिकाणी हा माल पोहोचवला जातो.
कुठे व कशी होते विक्री?
संकलन केंद्रावरून शेतकरी खरेदी केलेला माल थेट मोठ्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना, सुपर मार्केटमध्ये, मॉलमध्ये किंवा परदेशात निर्यात करू शकतात. विक्री व्यवस्था सेट करण्यासाठी मात्र मेहनत करावी लागते. स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या मालाची प्रत आणि पॅकिंग चांगली असणे गरजेचे आहे.
प्रक्रिया उद्योगासाठी महत्त्वाचे
पुरंदर तालुक्यात सिताफळ आणि अंजीरावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग सुरू झाले आहेत. त्याचबरोबर येथे केसर आंबा, स्ट्रॉबेरीवरही प्रक्रिया केली जाते. शेतकऱ्यांचा कमी प्रतीचा मालही प्रक्रिया उद्योगासाठी वापरला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना माल वाया जाण्याची किंवा माल विक्री न होण्याची भिती नाहीशी होते.
उत्पन्न
शेतकऱ्यांकडून बाजारदरापेक्षा जास्त दराने खरेदी केलेल्या मालाची साफसफाई, पॅकिंग आणि ग्रेडिंग केल्यामुळे त्या मालाची किंमत साहजिकच वाढते. त्याचबरोबर व्यापारी किंवा बाजारपेठांचा कोणताही हस्तक्षेप नसल्यामुळे थेट ग्राहकांपर्यंत हा माल जास्त दरात विक्री होतो. परिणामी फळे संकलन केंद्र आणि शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होतो.