कोल्हापूर : 'गोकुळ'दूध संघाकडे सध्या साडेआठ लाख लिटर गाय दूध संकलन आहे. त्यापैकी सुमारे दोन लाख लिटर गाय दूध अतिरिक्त ठरत आहे. हे दूध पावडर आणि बटरकडे वळवावे लागत असले, तरी त्याला तेवढा दर मिळत नाही. त्यामुळे या दुधाची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
पावसाळा सुरू झाल्याने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता सहज होणार असल्याने दुधाचे उत्पादन आणखी वाढणार आहे. त्यामुळे 'गोकुळ'ने पुणे व मुंबई बाजारपेठेत विक्री वाढवण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
'गोकुळ'चे सरासरी १६ लाख लिटर प्रतिदिनी दूध संकलन आहे. त्यातील ५० टक्के गायीचे दध आहे म्हैस दुधाला पुणे व मुंबईत मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ते दूध अजूनही कमी पडत आहे. साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ पासून अतिरिक्त गाय दुधाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
प्रत्येक उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होते आणि मागणी वाढते; पण यंदा कडक उन्हाळा व दुष्काळ असतानाही राज्यातील दूध उत्पादन कमी झाले नाही. त्याचा परिणाम म्हणून गायीचे अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पावसाळा सुरू झाला असून, आता हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक होणार असल्याने आणखी दूध वाढणार आहे. दूध वाढ अपेक्षित धरून त्याचे नियोजन करावे लागणार आहे.
'शक्ती दुधा'ची ३५ हजार लिटरने विक्री वाढली
गोकुळ'ने अतिरिक्त गाय दूध डोळ्यासमोर ठेवून 'शक्ती दूध' बाजारात आणले आहे. त्यातून मोठ्या शहरात ३५ हजार लिटरने विक्री वाढली आहे.
मध्य प्रदेशमध्ये म्हशीचे दूध मिळते ५० रुपये लिटर
देशात सगळीकडेच दुधाचे उत्पादन वाढले आहे. पुणे व मुंबई येथील दबेलामध्ये सरासरी ८० रुपयांनी म्हैस दूध विक्री होते. मात्र, आता मध्य प्रदेशमधून ५० रुपये लिटरने दूध मिळू लागल्याने या दरावरही परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गाय दुधाची गुणवत्ता चांगलीच
राज्यातील इतर दूध संघांच्या तुलने तुलनेत 'गोकुळ'चे गाय दुधाची गुणवत्ता अधिक चांगली आहे. त्याचे मार्केटिंग करून मोठ्या शहरात विक्री वाढविण्याची गरज आहे.
गाय दूध अतिरिक्त होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी गोकुळ प्रशासनाने दुधाची विक्री वाढविण्यासाठी उपाययोजना सुरु केली आहे. - योगेश गोडबोले कार्यकारी संचालक, 'गोकुळ
अधिक वाचा: आनंदाची बातमी; राज्यात १,२४५ महसूली मंडळांमध्ये चारा डेपो उघडण्यास मान्यता