राजाराम लोंढे
कोल्हापूर : परराज्यात म्हैस खरेदीवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी 'गोकुळ'च्या प्रयत्नातून 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकारातून दूध उत्पादकांसाठी कोल्हापुरातच 'मुन्हा', 'मेहसाणा', 'जाफराबादी' म्हशी मिळणार आहेत.
केर्ली (ता. करवीर) येथे गोठा तयार केला असून, दुधाची खात्री करूनच म्हैस खरेदी करायची आहे. गुरुवारपासून जनावरांची खरेदी-विक्री सुरू होणार आहे.
शेतकरी जातिवंत म्हशींच्या खरेदीसाठी गुजरात, हरयाणा, पंजाब येथे जातात. 'गोकुळ', जिल्हा बँकेने प्रोत्साहन दिल्याने एक हजाराहून अधिक म्हशी आल्या.
पण, शेतकऱ्यांची फसवणूक थांबून खात्रीशीर म्हैस मिळावी, यासाठी 'एनडीडीबी'ने पुढाकार घेतल्याने जातिवंत म्हशी कोल्हापुरातच मिळणार आहेत. यापूर्वी 'वारणा' येथे गायींसाठी गोठा केला आहे. पण म्हशींसाठीचा महाराष्ट्रातील पहिला गोठा केर्लीत होत आहे.
आरोग्यकार्डही मिळणार
'एनडीडीबी' संबंधित म्हशीचे आरोग्यकार्ड शेतकऱ्यांना देणार आहे. यामध्ये त्या जनावराचे वय, वेत कितवे, लसीकरण, निरोगी असल्याचे प्रमाणपत्र आदी माहिती दिली जाणार आहे.
अशी करते खरेदी
एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसची पंजाब येथील तज्ज्ञांची टीम शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन जातिवंत म्हशी खरेदी करते. त्याच्या आरोग्याच्या सर्व तपासण्या व लसीकरण करून कोल्हापुरात आणणार आहे.
असा राहू शकतो म्हैस दर
दूध (किंमत)
८ ते १० लिटर (८५ हजार ते १ लाख)
१० ते १२ लिटर (१ ते १.४० लाख)
चेतन नरके यांची मागणी
इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी कोल्हापुरात अशा प्रकारचा गोठा व्हावा, अशी मागणी 'एनडीडीबी'कडे केली होती. म्हशी आणताना तिच्या आरोग्याच्या सर्व तपासण्यांसह डीएनए चाचणीही केली पाहिजे. म्हैस निरोगी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यास विमा कंपन्यांच्या तांत्रिक गोष्टीत अडकून लाभापासून शेतकरी वंचित राहणार नाहीत.
हे होणार फायदे
• शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार.
• दुधाची खात्री.
• व्यवहारात पारदर्शकता येणार.
• वाहतुकीत रेडके दगावण्याचा धोका कमी.
• लसीकरण झालेल्या म्हशी मिळणार.
शेतकऱ्यांची फसवणूक थांबून चांगली म्हैस मिळणार आहे. त्यातून गोकुळ'चे दूध उत्पादनही वाढणार आहे. - अरुण डोंगळे, अध्यक्ष, गोकुळ