राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण आणि खाद्य अभियान राबविले जाते. पडीक किंवा गवती कुरणक्षेत्र जमिनीवर पात्र शेतकऱ्यांना मका बियाण्यासाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत यापूर्वी उन्हाळ्यात सन २०२३-२४ या वर्षाकरिता वैरण बियाणे वाटप करणे या योजनेसाठी पात्र लाभार्थ्याकडून मे महिन्यात अर्ज मागविले होते. वैरण व पशुखाद्य विकास या सर्वसाधारण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर प्रती लाभार्थी १५०० रुपये मर्यादित वैरण बियाणे वाटप केले होते. आता खरीप हंगामातही वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र व पडीक जमिनीवर वैरण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान दिले.
काय आहे अभियान ?
पशुधन उत्पादन प्रणालीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान सुरु करण्यात आले.
जनावरांच्या चारा आणि खाद्य स्त्रोताच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे दिले जाते.
कोणत्या जमिनीत घेता येते वैरण?
वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र व पडीक जमिनीवर वैरण घेता येते.
योजनेचे निकष काय?
शेतकऱ्याकडे सातबारा, आठ अ असावा. जमीन पडीक, गवती कुरणक्षेत्र असावी.
या योजनेत प्रती लाभार्थी १५०० रुपये मर्यादित वैरण बियाणे वाटप करण्यात येते.
शासनाचे १०० टक्के अनुदान
वैरण उत्पादनासाठी १०० टक्के अनुदानावर पात्र शेतकऱ्यांना बियाणे पुरविण्यात येते.
कोठे अर्ज करणार?
स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समितीस्तरावर पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारले जातात. तेथून उपलब्ध अनुदानानुसार पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज पाठविले जातात.