जुलै ते सप्टेंबर हा महिना तसा पावसाचा. पावसाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनावरांना सर्पदंश होतो. तशा अनेक घटना घडतात. दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करावे लागतात. अनेक वेळा उपचाराअभावी खूप मोठे नुकसान होते.
त्यामुळे पशुपालकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यानंतर दिसणारी लक्षणे, त्यावरून विषारी की बिनविषारी साप चावला आहे ते ओळखणे, तसेच करावयाची उपाययोजना याची माहिती असणे आवश्यक आहे.
अलीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा वाढल्या आहेत. पूरसदृश परिस्थितीमुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक सापांचे स्थलांतर होत असते. त्यासाठी पशुपालकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
शिराळ्यातील नागपंचमी आणि जिल्ह्यातील सर्व सर्पमित्रामुळे सर्वांना नाग, घोणस, फुरसे आणि मन्यार या विषारी सापांची ओळख झाली आहे. एकूण देशांमध्ये ३०० सापांच्या जाती आहेत. त्यापैकी जवळजवळ ५० जाती विषारी असून त्यापैकी वरील चार जाती ह्या अतिविषारी आहेत.
सर्पदंश हा विशेषतः तोंडावर, पुढच्या किंवा मागच्या पायावर होतो. चरायला गेलेल्या जनावरांमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते.
सर्पदंशाची लक्षणे
● सर्पदंश झालेल्या ठिकाणी खूप सूज येते. पायावर चावा झाल्यानंतर सुरुवातीला सूज खालच्या बाजूला येते नंतर मात्र ती सूज वरच्या दिशेने दिसायला सुरुवात होते. जनावर लंगडते, रक्तस्त्राव होतो. नाकातून, लघवीतून रक्तस्त्राव होतो.
● नाग दंश झाला तर जनावर २ थरथरते, तोंडातून लाळ गळते. जनावरे दात खातात, पापण्याची उघडझाप बंद होते. लाळ गळते. पुढे जाऊन जनावर आडवे पडून झटके देते. घोणस दंश झाल्यावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन वेगाने सूज वाढते. उपचारास विलंब झाला तर कोरडा गँग्रीन होतो.
● मण्यार दंशात सूज कमी असते. लक्षणे उशिराने दिसतात. अंतर्गत रक्तस्राव होत असल्याने पोटात दुखते. झटके येऊन जनावर उठ बस करते. अशा प्रकारची लक्षणे दिसतात. याकडे पशुपालकांनी लक्ष द्यावे.
विषारी बिनविषारी सर्पदंश ओळखणे
विषारी साप चावल्यास दोन खोल जखमा दिसतात. बिनविषारी सर्पदंशात इंग्रजी यू आकारात खरचटल्या प्रमाणे जखमा दिसतात. विषारी सर्पदंशात वेदना खूप होतात. खाणे पिणे बंद होते. रक्तस्त्राव होतो. तातडीचे उपाय म्हणून जनावरांना पूर्ण विश्रांती द्यावी. हालचाल टाळून दंश झालेल्या वरच्या बाजूला घट्ट पट्टीने आवळून बांधावे व दर वीस मिनिटाला अर्धा मिनिट सोडावे. अघोरी उपाय करू नयेत. तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्क साधून माणसांना जे अँटिस्नेक व्हेनम दिले जाते ते वापरून उपचार करून घ्यावेत.
सर्पदंश टाळण्यासाठी
सर्प दंश टाळण्यासाठी निवारा सुरक्षित करणे, गोठा व परिसरात आडगळ राहणार नाही, याची काळजी घेणे, त्याबरोबर दाट कुरणात जनावरे चरायला न सोडणे. तसेच पावसाळ्यात शक्यतो गोठ्यातच संगोपन करावे. या पद्धतीने आपण आपले पशुधन सर्पदंशापासून दूर ठेवू शकतो.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन
अधिक वाचा: पावसाळ्यात जनावरांचे व्यवस्थापन करण्यासाठी राबवा हा चारसूत्री कार्यक्रम