अनेकदा जनावरे आजारी पडली किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात काही समस्या निर्माण झाली की पशुपालक शेतकऱ्यांना तातडीने जनावरांच्या डॉक्टरांची आठवण येते. महाराष्ट्रात काही ठिकाणी पुरेसे जनावरांचे डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या पशुपालकांच्या तक्रारी असतात. मात्र केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने हा दावा खोडून काढला आहे. राज्यात पुरेसे पशुवैद्यक आहेत असे सरकारचे म्हणणे आहे. या संदर्भात संबंधित मंत्र्यांनी संसदेत निवेदनही दिले होते.
पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करण्याचे राज्यांना अधिकार असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. राज्य सरकारांनी/ राज्य विद्यापीठांनी सुरू केलेल्या/ चालवण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांना, पशुवैद्यकीय शिक्षणामध्ये उच्च गुणवत्ता टिकवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने केलेल्या शिफारशींच्या आणि नियमांच्या आधारे मान्यता दिली जाते. तसेच भारतीय पशुवैद्यकीय परिषदेकडून शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खाजगी महाविद्यालयांवर देखील नियंत्रण ठेवले जाते.
दरम्यान भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात ३१ मार्च २३ पर्यंत 81,938 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत.
पशुसंवर्धन हा राज्यांच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भरती राज्यांकडून आजाराच्या महामारी विज्ञानाच्या स्थितीनुसार आणि प्राण्यांच्या परिस्थितीनुसार निर्माण होणाऱ्या गरजांच्या आधारे केली जाते. राज्याकंडून मिळालेल्या माहितीनुसार काही राज्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तुटवड्याचे प्रमाण बदलते आहे तर काही राज्यांमध्ये कोणताही तुटवडा नाही, असे केंद्र सरकारच्या संबंधित विभागाचे म्हणणे आहे.
देशातील कुठल्या राज्यात किती पशुवैद्यक आहे, त्याच्या तक्ता पुढीलप्रमाणे
राज्य | जनावरांचे डॉक्टर |
अंदमान व निकोबार | 59 |
आंध्र प्रदेश | 5324 |
अरुणाचल प्रदेश | 232 |
आसाम | 3154 |
बिहार | 3464 |
छत्तीसगढ | 1215 |
चंडीगढ | 13 |
दादरा नगर हवेली | 4 |
दीव व दमण | 1 |
दिल्ली | 466 |
गोवा | 222 |
गुजरात | 4447 |
हरियाणा | 2372 |
हिमाचल प्रदेश | 1402 |
झारखंड | 927 |
कर्नाटक | 4786 |
केरळ | 5172 |
लक्ष्यद्वीप | 34 |
मध्य प्रदेश | 3039 |
महाराष्ट्र | 10570 |
मणिपूर | 561 |
मेघालय | 433 |
मिझोराम | 351 |
नागालँड | 350 |
ओडिशा | 2791 |
पुडूच्चेरी | 535 |
पंजाब | 4285 |
राजस्थान | 4853 |
सिक्कीम | 199 |
तामिळनाडू | 6245 |
त्रिपुरा | 451 |
उत्तर प्रदेश | 6907 |
उत्तराखंड | 1156 |
पश्चिम बंगाल | 2661 |
तेलंगाणा | 2124 |
जम्मू आणि कश्मिर | 1057 |
लडाख | 76 |
एकूण : 81938 |