भारतीय शेतीमध्ये पशुपालनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पशुपालनापासून शेतकऱ्यांना अर्थिक उत्पन्न, रोजगार, शेणखत आणि इतर फायदे मिळतात. पशुपालनातुन शेतकन्यांना अर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी हिरव्या चाऱ्याची सतत गरज भासते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची उणीव भासते. हवामान बदल, दुष्काळी परिस्थीती, नापीक जमीन यामुळे शेतकरी जनावरांना पुरेसा हिरवा चारा देऊ शकत नाही. बऱ्याचदा जनावरांना वाळलेला चारा दिला जातो. अशा परिस्थीतीत उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा देण्यासाठी काटे विरहीत निवडुंगाची (कॅक्टस) लागवड हा चांगला पर्याय पुढे येत आहे.
निवडुंग, नागफणी किंवा कॅक्टस हे प्रामुख्याने एक काटेरी झाड म्हणून ओळखले जाते. तिचा वापर शोभेची वनस्पती म्हणून केला जाते. या निवडुंगाचे विविध प्रकार आहेत. विविध प्रकाराचे आकार असलेल्या निवडुंगाच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी बहुतांशी प्रजाती मध्ये काटे आणि जाड त्वचा असते. परंतु, काही निवडुंगांना काटे नसतात. त्यांना काटे विरहित निवडुंग असे म्हणतात. निवडुंगा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीच्या जातीमध्ये त्रिधारी चौधारी आणि फड्या निवडुंग असे प्रकार आहेत. फड्या निवडुंग त्याच्या सपाट खोडनागाच्या फनिच्या आकाराची पाने आणि फळासाठी ओळखला जातो त्यामुळे त्याला आपण नागफणी सुध्दा म्हणतो.
निवडुंगाच्या पानाच्या दोन्ही बाजुस कोंब येत असतात व त्यापासुन पाने एकावर एक नवीन येतात अशी रचना या वनस्पतीमध्ये दिसून येते. निवडुंगाच्या पानांमध्ये ८० ते ८५ % पाणी असते. तथापि, या वनस्पतीस जगण्यासाठी अत्यंत कमी पाणी लागते. म्हणून निवडुंग हे अतिशय प्रतिकुल परिस्थितीत, दुष्काळी भागात, अति उष्णता किंवा थंडी अशा परिस्थितीमध्ये तग धरून राहते. यामुळे निवडुंगाची लागवडे कमी पर्जन्यमान किंवा मुरमाड, नापीक, पडीक जमिनीत सुध्दा करता येते. निवडुंग लागवड व्यवस्थापनासाठी अत्यंत कमी देखभाल खर्च लागतो.
निवडुंगाच्या पानांमध्ये ७ ते ११% शुष्क पदार्थ, ५ ते ९% प्रथिने, ११ ते २० % तंतुमय पदार्थ, १२ ते २५ % खनिजे, २ ते ३ % स्निग्धांश व जीवनसत्वे असतात. निवडुंगाच्या पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम इत्यादी खनिजे असतात. पानांमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असते तर कर्बोदकांचे प्रमाण ६० ते ८० % असते त्यामुळे पानांची पचनियता अधिक असते. कित्येक लोकांना निवडुंगाबद्दल माहित असते. तथापि, काट्यांमुळे चारा म्हणुन विचार केलेला नसतो. परंतु आता कोटेविरहिरीत प्रजातीमुळे निवडुंगाचा वापर चारा म्हणुन कारणे शक्य झाले आहे. या काटेविरहित निवडुंगाचा वापर विशेषतः उन्हाळयामध्ये हिरवा चारा म्हणून करता येतो.
जमीन आणि हवामान
निवडुंग पिकास कडक उन्हाळा आणि कोरडा हिवाळा असे हवामन चांगले असते. निवडुंग अतिशय प्रतिकुल परिस्थितीमध्ये येणारे पीक असल्यामुळे नापीक / पडीक जमिनीत घेता येते. परंतु अधिक उत्पादनासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी डोंगर उताराची अथवा मुरमाड जमिनीची निवड करावी.
क्युरिंग आणि बेणे प्रक्रिया
काटे विरहित निवडुंग लागवडीसाठी पाच ते सहा महिने जुन्या झालेल्या उत्तम जातीच्या टवटवीत परिपक्व पानांची निवड करावी. ही पान देठापासून धारदार चाकून कापून घ्यावीत. मातृवृक्षापासून लागवडीसाठी कापलेली पाने सावलीमध्ये दहा ते पंधरा दिवस सुकवावीत अथवा क्युरिंग करावीत कारण ताज्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण ८० ते ८५ % असते. अशावेळी पानांची लागवड केल्यास सडण्याचे प्रमाण जास्त असते. लागवडीसाठी काढलेल्या पानांना मातीचा संपर्क येऊ नये म्हणून ताजी कापलेली पाने ताडपत्री किंवा चटईवर सुकविण्यासाठी (क्युरिंग) ठेवावीत. पीक लागवडीनंतर कुजव्या रोगापासून संरक्षण व्हावे म्हणून क्युरिंग केलेली पाने बोर्डो मिश्रण अथवा मॅन्कोझेब दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात बुडवून किंवा पाने फुले ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत. ट्रायकोडर्माचे द्रावण तयार करताना दहा लिटर पाण्यात ५० ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळून घ्यावे व त्याद्रावणात एकेक करून सर्व लागवडीची पाने बुडवून घ्यावीत.
लागवड
निवडुंग चारा पिकाची लागवड शक्यतो दोन फूट रुंद व एक फूट उंच बेडवर करावी जेणेकरून पाणी साचणार नाही. लागवडीसाठी दोन ओळींतील अंतर तीन मिटर आणि दोन झाडांमधील अंतर दोन मीटर ठेवून एक बाय एक फूट आकाराचा अर्धा फूटखोल खड्डा घ्यावा. यापेक्षाही कमी अंतरावरती लागवड केली जाते. लागवडीसाठी तयार केलेल्या खड्डयामध्ये साधारणपणे चांगले कुजलेले शेणखत व रासायनिक खताची मात्रा मातीमध्ये मिसळून द्यावी. निवडुंगाची लागवड करताना सुकविलेल्या पानांचा पसरट भाग पूर्व पश्चिम ठेवून लागवड करावी. तसेच लागवड करताना १/३ भाग जमिनीत राहील याची काळजी घेउन पानाच्या लगतची माती चांगली दाबून घ्यावी. साधारणतः कॅक्टस लागवडीसाठी ३x२ अंतरासाठी हेक्टरी १७०० तर नर्सरीसाठी २x१ अंतरासाठी ५००० पानांची गरज भासते.
सुधारित वाण
काटेविरहित निवडुंग लागवडीसाठी १२७० १२७१. १२८०, आणि १३०८ या सुधारित वाणांची निवड करावी.
लागवडीचा हंगाम
काटेविरहित निवडुंग लागवड साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात करावी कारण या हंगामामध्ये निवडुंगाची जास्तीत जास्त पाने जगतात.
रासायनिक खते
निवडुंग पिकास रासायनिक खतांची गरज खूप कमी लागते. परंतु, अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे परिणाम झाडाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतो. त्यामुळे पीक लागवडीच्या वेळी पाच टन चांगल कुजलेले शेणखत आणि ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद व पालाशची मात्रा प्रति हेक्टरी द्यावी. चाऱ्यासाठी निवडुंगाची पाने कापणी केल्यास दरवेळी २० किलो नत्राचा प्रति हेक्टरी हप्ता द्यावा. हिवाळ्यामध्ये खतांचा वापर केल्यास नवीन पाने वाढीस चांगली मदत होते.
पाणी व्यवस्थापन
निवडुंग पिकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असल्यामुळे हे पीक कमी पाण्यात येते. प्रथम लागवडीनंतर दोन ते तीन दिवसातून एकदम अल्पप्रमाणात पाणी द्यावे. त्यानंतर एका वर्षापर्यंत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात. पूर्णपणे स्थापित झालेल्या पिकास खूपच कमी प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे कमी पाण्यावर सुध्दा या झाडाची वाढ चांगली होऊन उत्पादन मिळते.
किड व रोग नियंत्रण
निवडुंगाच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. जसे की मर रोग, कुज, पानांची सड इत्यादी. या रोगांच्या व्यवस्थापनासाठी पानांची काढणी झाल्यावर ज्या भागावर काप घेतला जातो त्याठिकाणी रोडोमिल या बुरशीनाशकाची ०.१ % या प्रमाणात फवारणी करावी. लागवडीच्या वेळेस पाने ट्रायकोडर्मा किंवा मॅन्कोझेब या बुरशीनाशकात बुडवून लावावीत. निवडुंग पिकावरील पिठ्या ढेकनांच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस २० इसी २ मिली प्रति १० लिटर पाणी किंवा प्रोफेनोफॉस ५० इसी २० मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास चांगले नियंत्रण मिळते. तसेच कीटकनाशकाची फवारणी केल्यास एक ते दीड महिन्यानंतर ते जनावरांना खाऊ घालावे.
काढणी व वापर
चांगल्या पौष्टिक काटेविरहित निवडुंग चाऱ्याची पूर्ण वाढ झालेल्या पानांची कापणी करावी. जेणे करुन त्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी होऊन चाऱ्याच्या पौष्टिकतेचे प्रमाण चांगले मिळते. एका वर्षानंतर साधारणतः १० ते १५ नवीन पाने येतात तेव्हा त्यांची चाऱ्यासाठी कापणी करावी. कापणी करताना निवडुंगाची खालची एक ते दोन पाने तशीच ठेवून बाकीच्या पानांची संख्या तिसऱ्या वर्षी ३० ते ३५ होते. ही कापलेली पाने गुरांच्या गोठ्यात नेऊन धारदार चाकूने किंवा कोयत्याने बारीक तुकडे करावेत. हे तुकडे कोरड्या चाऱ्यासोबत शेळी किंवा मेंढीला ५ ते ६ किलो आणि गाय किंवा म्हैस यांना १० ते १५ पाने अशा प्रमाणात मिसळून द्यावे. साधारणपणे कोरड्या चाऱ्याच्या २५ % प्रमाणात या पानांचे बारीक तुकडे मिसळावेत. यामुळे चारा टंचाईच्या काळातही पशुधनापासून चांगले उत्पन्न मिळेल.
उत्पादन
जसजशी निवडुंगाची झाडे जुनी होतात तसतसे उत्पादन वाढत जाते. हे उत्पादन ३० ते ८० टनापर्यंत प्रति हेक्टरी येते. अशाप्रकारे आवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये पशुपालन करणारे शेतकरी यांनी उन्हाळयात किंवा दुष्काळामध्ये हिरवा चारा मिळावा म्हणून त्यांच्या पडीक आणि नापीक जमिनीत काटेविरहित निवडुंगाची लागवड करावी.
डॉ. शिवाजी दमामे, डॉ. संदिप लांडगे आणि डॉ. गजानन देवरे
अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
०२४२६-२४३२४९