नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी (Ragi) किंवा फिंगर मिलेट (Finger Millet) म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचेपीक खरीप हंगामात घेण्यात येते.
नाचणी मध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर आहे. ही दोन्ही खनिजद्रव्ये हाडे आणि दातांच्या वाढीसाठी, बळकटीकरणासाठी आणि मजबूती कायम ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. सध्या आपण सर्वत्र ऐकतो की हाडांशी संबंधीत तक्रारी जास्त प्रमाणात दिसून येत आहेत.
विशेष करून मध्यमवर्गीय आणि वयस्कर स्त्री पुरुषांमध्ये या तक्रारी उदा. गुडघे दुखी व हाडांचा ठिसूळपणा जास्त प्रामणात आढळून येतो. त्याचे मुख्य कारण हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या खनिजद्रव्यांचा अभाव असणे. हा अभाव दुर करण्यासाठी नाचणीचा आहारातील वापर वाढणे आवश्यक आहे जेणेकरुन हाडांचे आरोग्य राखण्यास मदत होईल.
यासाठी आपल्याला नाचणीचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करुन आहाराचे पौष्टिकमूल्य वृद्धिंगत करावे लागेल. नाचणीयुक्त अन्नपदार्थाचा वापर हा लहान मुले आणि गरोदर स्त्रिया यानांही अतिशय लाभदायक ठरेल. नाचणीचा उपयोग आहारात करण्यासाठी नाचणीवरील आवरण काढून टाकवे लागते.
अशी आवरण काढलेली नाचणी संबंध रवा, पीठ अशा स्वरुपात विविध पदार्थ बनविण्यासाठी वापरता येते. दैनंदिन आहारात समावेश करण्यासाठी नाचणीचे अनेक पदार्थ बनविता येतात. नाचणीपासून विविध पौष्टीक पदार्थ बनविले जातात त्यात प्रामुख्याने नाचणीचे सत्व, लाडू, बिस्किटे इ. समावेश आहे आपण याची पाककृती पाहणार आहोत.
नाचणीची बिस्कीटे
साहित्य:
नाचणी पीठ ५० ग्रॅम, मैदा ५०२ ग्रॅम, वनस्पती तुप ७५ ग्रॅम, साखर ५० ग्रॅम, दुध पावडर १० ग्रॅम, बेकींग पावडर ५ ग्रॅम, व्हॅनिला इसेंस ४-५ थेंब इ.
कृती:
१) मैदा, नाचणीचे पीठ, व बेकींग पावडर एकत्र चाळुन घ्या.
२) तूप फेटून त्यात पीठ, साखर, दुध वावडर व इसेंस टाकून घट्ट उंडा बनवा.
३) उंडा लाटून बिस्किट कापून घ्यावेत.
४) कापलेली बिस्किटे १७५ अंश सेल्सियस तापमानावर १५ मिनिटे बेक करावीत.
नाचणीची खारी बिस्कीटे
साहित्य: नाचणीचे पीठ ५० ग्रॅम, मैदा ५० ग्रॅम, तुप ७५ ग्रॅम, साखर ७ ग्रॅम, मीठ ३.५ ग्रॅम, बेकिंग पावडर ५ ग्रॅम, जीरे ७ ग्रॅम, ओवा ५ ग्रॅम इ.
कृती:
१) नाचणीचे पीठ, मैदा, बेकींग पावडर एकत्र चाळून घ्यावे.
२) तूप फेटून त्यात पीठ, मीठ, जीरे, ओवा टाकुन उंडा बनवा.
३) उंडा लाटुन बिस्किट मोल्डच्या सहाय्याने बिस्किटे कापून १७५ डिग्री सेल्सीअस तापमानावर १२ मिनिटे बेक करा.
नाचणीचे लाडू
साहित्य: नाचणीचे पीठ २ कप, दुध १ कप, गुळ चवी पुरता, खवा तुपात भाजलेला, तूप १ कप, दळून वेलची १ चमचा
कृती:
१) नाचणीचा छान सुगंध येईपर्यंत नाचणीचे पीठ तुपात भाजून घ्या.
२) दूध गरम करून त्यात किसलेला किंवा चूर्ण केलेला गूळ घालून शिजवलेले पीठ, खवा आणि वेलची यांचे मिश्रण तयार करा. व्यवस्थित एकजीव करावे आणि लाडू बांधावेत.
नाचणीचे बेसन लाडू
साहित्य: नाचणीचे पीठ ६० ग्रॅम, बेसन ४० ग्रॅम, पीठी साखर ७० ग्रॅम, विलायची पावडर २ ग्रॅम, किसलेले खोबरे २० ग्रॅम इ.
कृती:
१) नाचणीचे पीठ व बेसन थोड्याश्या तुपावर स्वतंत्र भाजून घ्यावे
२) भाजलेल्या पीठात पीठी साखर, विलायची, खोबरे टाकून मिश्रण एकत्रीत करावे.
३) तूप पातळ करुन मिश्रणात टाकावे व पुन्हा व्यवस्थित एकजीव करावे आणि लाडू बांधावेत.
नाचणीचे सत्व
कृती:
१) नाचणी स्वच्छ करून १० ते १२ तास भिजत घालावी.
२) पाण्यातून काढून सुती कपड्यात बांधुन १० ते १२ तास ठेवावी म्हणजे नाचणीला मोड येतील.
३) मोड आलेली नाचणी सावलीत वाळवून घ्यावी. वाळल्यानंतर हाताने चोळून, पाखडून घ्यावी. स्वच्छ झालेल्या नाचणीचे बारीक पीठ करावे.
४) हे पीठ उकळत्या पाण्यात किंवा दूधात शिजवून त्यात चवीनुसार साखर, विलायची पुड टाकून खावे. हे सत्व शीशु, लहान मुले, वृध्द व्यक्ती यांच्यासाठी खूप उपयोगी आहे. इतर कुणीही खाण्यासाठी योग्य आहे.
या शिवाय नाचणीपासून चकली, शेव, पराठा, पापड, थालीपीठ, शंकरपाळे, वड्या, उपमा, खिचडी, असे कितीतरी पौष्टिक मुल्यवर्धित पदार्थ बनविता येतात.
प्रा. दिप्ती पाटगावकर
कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र, खामगाव, बीड-२
अधिक वाचा: हरभऱ्याला जास्तीचा भाव मिळविण्यासाठी काढणीनंतर अशी करा प्रक्रिया