लाळ खुरकुत रोग गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या-मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. जंगलातील हरीण, काळवीट अशा दुभंगलेल्या खुर असणाऱ्या प्राण्यातदेखील हा संसर्गजन्य रोग आढळतो. या रोगामुळे दूध उत्पादनामध्ये घट, जनावरांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम यासह बैलांच्या क्रयशक्तीवर परिणाम होतो. सोबत लहान वासरे, रेडकं यांच्यांत मरतुक होत असल्यामुळे दोन-चार जनावरे असणाऱ्या पशुपालकांचे या रोगामुळे प्रचंड नुकसान होते.
प्रसार
- प्रामुख्याने हवेमधून, दूध, शेण, लघवी, वीर्य पाणी पिण्याच्या जागा, गोठ्यात वापरत असलेली भांडी यांच्यामधून प्रसार होतो.
- बाधित जनावरांचा संपर्क येऊ शकणाऱ्या जागा म्हणजे जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने, साखर कारखान्याचे हंगाम त्याचबरोबर स्थलांतरित पक्षीदेखील लाळ खुरकुत रोगाचा प्रसार करू शकतात.
- बाधित जनावरातील लाळ इतर सर्व स्त्रावातून या विषाणूचा प्रसार होतो.
- रोगाचा संक्रमण कालावधी दोन ते सहा दिवस दिवसापर्यंत असतो. मरतुकीचे प्रमाणसुद्धा विषाणूच्या तीव्रतेवर अवलंबून असते. २० ते ५० टक्क्यांपर्यंत मरतूक होऊ शकते.
- रोगाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे काही ठिकाणी १०० टक्के जनावरे बाधित होताना दिसतात.
लक्षणे
- वैरण-पशुखाद्य न खाणे, दूध उत्पादन घटणे, १०४ ते १०५ अंश फॅरेनाइटपर्यंत ताप येऊन तोंडात पुरळ व फोड येतात.
- पायातील खुरांच्या बेचक्यात, कासेवरदेखील फोड येतात. ते फुटतात व जखमा होतात.
- वजन घटते, कासेवरील फोड, जखमामुळे वासरांना बाधा होऊ शकते.त्यांच्यात मरतुकदेखील होते.
- बरी झालेली जनावरे अशक्त होतात, दूध कमी देतात.
- हृदय व फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते.
- जनावरे गाभडतात. अनेकवेळा जनावरांमध्ये वंध्यत्व येते. मग अशी कमी उत्पादन देणारी जनावरे हे पशुपालकांना पोसण्याशिवाय पर्याय राहत नाही.
पशुधनावर असे करावेत उपचार
प्रतिजैवके, ४ टक्के पोटॅशियम परमॅग्नेट किंवा २ ते ४ टक्के सोडियम बायकार्बोनेट किंवा १ ते २ टक्के तुरटीच्या दावणाने तोंड, पायातील जखमा धुणे, सोबत बोरो ग्लिसरीन, तेल-हळद, तोंडातील जखमांना लावणे, पातळ पेंड, कांजी, गूळ व पीठ यांचे मिश्रण, मऊ हिरवे गवत, २४ तास स्वच्छ पाणी देणे, ताण कमी करणारी औषधे व जीवनसत्त्वाची इंजेक्शन किंवा पातळ पावडर स्वरूपात खाद्यातून देणे, सलाइन देणे असे सर्व करावे लागते. या रोगाच्या निर्मूलनावर प्राणिजन्य पदार्थाची आयात-निर्यात अवलंबून आहे.
अधिक वाचा: पशुवैद्यकीय दवाखान्याचे कामकाज कसे चालते आणि तिथे कोणत्या सेवा मिळतात?
लसीकरण
सांगली जिल्ह्यातील तीन लाख २४ हजार ७५६ गाई व चार लाख ९३ हजार ९९८ म्हैशी अशा एकूण आठ लाख १८ हजार ७५४ पशुधन आहे. या पशुधनास लसीकरण सुरू आहे. २६ जानेवारी २०२४ अखेर एक लाख ५८ हजार ८२१ पशुधनाचे लसीकरण केले आहे. उर्वरित पशुधनदेखील येणाऱ्या काळात टोचले जाणार आहे. तथापि, जिल्हा सीमा भागाशी जोडलेला असल्याने व मोठ्या प्रमाणात साखर कारखाने सुरू असल्यामुळे लाळ खुरकुत रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. लसीकरणामुळे रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. ती वर्षभर टिकावी म्हणून जर सहा महिन्यांनी त्याला बूस्टर लसीकरण करावे.
या रोगाच्या निर्मूलनावर प्राणीजन्य पदार्थाची आयात निर्यात अवलंबून आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ज्या प्रकारे पशुपालकाच्या खिशाला चाट बसते त्याप्रमाणे देशाच्या आर्थिक उलाढाली वर दूरगामी परिणाम करणारा हा तसा भयंकर रोग आहे. जगातील प्रत्येक देशाचे या रोगाच्या प्रादुर्भावावर लक्ष असते त्यामुळे अशा रोगाच्या बाधित देशातील जनावरे, प्राणीजन्य उत्पादने इतर देश आपल्या देशात आयात करायला धजावत नाहीत किंबहुना करत नाहीत. त्यासाठी लसीकरण करून या रोगाचे समूळ उच्चाटन करण्याकरता सातत्याने फार मोठे प्रयत्न करावे लागतात.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग