Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > सिल्वर पापलेटचा महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसायावरील पगडा

सिल्वर पापलेटचा महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसायावरील पगडा

Impact of silver paplet fish on fishing industry in Maharashtra | सिल्वर पापलेटचा महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसायावरील पगडा

सिल्वर पापलेटचा महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसायावरील पगडा

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्वर पॉमफ्रेटला विशेष स्थान आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्वर पॉमफ्रेटला विशेष स्थान आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भारतातील अनेक राज्यांनी आपल्या राज्यातील वैशिष्ठ्यपूर्ण निवडक मत्स्य प्रजातीची (मासा) शाश्वतता, संवर्धन आणि वाढीसाठी “राज्य मासा” म्हणून घोषित केले आहेत. जेणेकरून या माध्यमातून त्या राज्यात माश्याचे जतन-संवर्धन, सागरी पर्यावरण, जीव साखळी आणि मच्छ‍िमारांची आर्थिक उपजीविका टिकवून ठेवता येईल.

महाराष्ट्र राज्याच्या मासेमारी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासोबत सिल्वर पॉम्फ्रेट (पापलेट/सरंगा) मासा त्याच्या स्वादिष्ट चव आणि अपवादात्मक पौष्टिक मूल्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्वर पॉमफ्रेटला विशेष स्थान आहे. पापलेट ही मस्त्य प्रजाती नामशेष होऊ नये यासाठी प्रबोधन, नियमन होणे या दृष्टिकोनातून सिल्वर पॉमफ्रेटला (पापलेट/सरंगा) महाराष्ट्राचा “राज्य मासा” म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे सातपाटी येथील दोन्ही मच्छीमार सहकारी संस्थांचे संयुक्त निवेदन मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आले होते.

पॅम्पस आर्जेन्टियस (Pampus argenteus), सिल्व्हर पॉमफ्रेट (Silver Pomfret), ही प्रजाती इंडो-वेस्ट पॅसिफिक, आशिया आणि पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीतील क्षेत्रात आढळते. सिल्व्हर पोम्फ्रेट्स सामान्यतः चांदीच्या/पांढऱ्या रंगाचे असून व लहान खवले असणारा मासा आहे. सिल्व्हर पॉम्फ्रेट या माश्याला स्थानिक पातळीवर पापलेट किंवा सरंगा म्हणून ओळखले जाते. पालघर जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात सिल्व्हर पॉम्फ्रेट मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने हे क्षेत्र “गोल्डन बेल्ट” म्हणून प्रसिद्ध आहे.

पापलेट हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त निर्यात केल्या जाणाऱ्यापैकी व्यावसायिकदृष्ट्या महत्वाचे आणि पसंतीचे एक सागरी अन्न आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्य विभागाने सिल्व्हर पॉमफ्रेटचे महत्व जाणून ऑक्टोबर २०२२ मध्ये टपाल तिकिट सुद्धा प्रसिद्ध केले आहे. या प्रजातीचे मासे ५०० ग्रॅम किंवा अधिक पर्यंत वाढू शकतात. तथापि, जास्त मासेमारी केल्यामुळे, जुवेनाईल फिशिंग, जागतिक तापमानवाढ (Global Warming) व प्रदूषण इत्यादीमुळे ह्या प्रजातीच्या मासेमारीवर परिणाम दिसून आलेला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून सिल्वर पॉम्फ्रेटचे उत्पादन कमी होत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पापलेटचे वार्षिक उत्पादन सन २०१९-२० मध्ये १८,००० टन व सन २०२०-२१ मध्ये १४,००० टन इतके होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पापलेट व्यापारातील बदलासह मासेमारी पद्धतीतील बदलांमुळे लहान आकाराच्या पापलेट माश्यांची मासेमारी मोठ्याप्रमाणात होत असल्याने भारताच्या वायव्य भागातील पापलेट माश्याचा साठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे.

आययूसीएन (International Union for Conservation of Nature) या आंतरराष्ट्रीयस्तरावरील संस्थेद्वारे जगातील प्रजातींच्या उपलब्ध संख्येच्या आधारे वर्गवारी करुन याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येत असते. या माहितीप्रमाणे पापलेट हा मासा “नामशेष न झालेले (Not Extinct)” वर्गवारी मोडत असला तरी, महाराष्ट्र राज्यातील सिल्वर पॉमफ्रेटच्या मत्स्योत्पादनामध्ये मागील काही वर्षामध्ये विशेष घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेता, महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पॅम्पस (सिल्वर पॉमफ्रेट) या उल्लेखनीय मत्स्य प्रजातीचे जतन करण्यासोबतच सागरी परिसंस्थेचे रक्षण, लहान मासळीच्या (Juvenile fishing) मासेमारीला आळा घालणे आणि शाश्वत मासेमारी पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या महत्त्वपूर्ण गरजेबद्दल जागरूकता वाढविणे आवश्यक आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यात सिल्वर पॉमफ्रेट हा मासा “राज्य मासा” म्हणुन घोषित करण्याचा निर्धार मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सोमवारी झालेल्या राष्ट्रीय परिषदेत केला आणि त्यानुसार घोषणा केली.

Web Title: Impact of silver paplet fish on fishing industry in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.