पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला असून अनेक वेळा हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडतोच असे नाही. काही वेळा हवामानातील अचानक बदलामुळे मोठ्या पावसासह पूर परिस्थिती उद्भवू शकते.
अशावेळी प्रत्येक पशुपालकांनी स्वतः पूर्ण तयारीत असणे आवश्यक आहे. अति पावसाळा, पूर परिस्थिती यामुळे होणा-या वातावरणातील बदलाचा ताण हा पशुधनावर येत असतो. त्यामुळे अनेक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
प्रत्येक पशुपालकाला आपल्या व्यवस्थापनात बदल करावे लागतात. रोग प्रादुर्भाव व उत्पादकता घटल्यामुळे पशुपालक अडचणीत येतात. खूप मोठे नुकसान सोसावे लागते. सांगली जिल्ह्यातील पशुपालकांनी आणि प्रशासनाने हा अनुभव खूप वेळा घेतला आहे.
पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टीसह गारपीट, वीज कोसळणे, पूर परिस्थिती उद्भवणे अशा सर्व नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. अशावेळी निवारा, चारा, पशुखाद्य, पाणी, आरोग्य सुरक्षा व जैव सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी सर्व पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
१) निवारा
- पावसाचे पाणी गळू नये, भिंती कोसळून नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी.
- सोबत जवळपास असणारे झाड सुद्धा कोसळून नुकसान होऊ शकते. यासाठी वेळीच गोठ्याची डागडुजी करून घ्यावी.
- जवळच्या झाडांची छाटणी करून घ्यावी. निवारा नसेल तर शास्त्रोक्त पद्धतीने निवाऱ्याची सोय करावी.
- गोठा कोरडा राहील यासाठी दक्षता घेऊन ओलावा कमी करण्यासाठी चुन्याची फक्की टाकून घ्यावी.
- जवळपास पाणी साठू नये म्हणून चर खोदून पाण्यास वाट करून द्यावी.
- सखल भागात गोठा असेल तर अतिवृष्टी झाल्यास आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या जागेची निवड व व्यवस्था करून ठेवावी.
२) चारा
- हिरवा चारा वापरताना तो कापणी योग्य स्थितीतील असावा. खूप कोवळा असू नये.
- वाळलेला चारा योग्य पद्धतीने साठवून त्याचा वापर करावा.
- अतिवृष्टी काळात जनावरे बाहेर चरावयास सोडू नये. विशेषतः नदीकाठच्या भागात काळजी घेणे आवश्यक आहे.
- चारा, पशुखाद्य भिजता कामा नये. कोरड्या जागेत साठवणूक करून भिजून बुरशी येणार नाही त्याची काळजी घ्यावी.
- मुरघास साठवलेल्या पिशव्या, बंकर, बेलर भिजता कामा नयेत व त्यामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.
३) पाणी
- स्वच्छ निर्जंतुक पाणी पिण्यासाठी उपलब्ध करावे.
- कोणत्याही परिस्थितीत साठवलेले पाणी जनावरांना पिऊ देऊ नये.
- पाणी साठवण्यासाठी वापरात असलेले हौद, टाक्या वेळेवर स्वच्छ धुऊन घ्याव्यात.
- त्यामध्ये शेवाळ वाढू नये यासाठी काळजी घेऊन आतून चुना लावून घ्यावा.
४) आरोग्य
- पावसाळ्यापूर्वी आपल्या सर्व पशुधनाचे शेण तपासून योग्य ते जंताचे औषध द्यावे.
- पशुवैद्यकीय दवाखान्यातील सूचनेनुसार लसीकरण करून घ्यावे.
- दुभत्या, गाभण गाई म्हशींची विशेष काळजी घ्यावी. कासेचे आरोग्य सांभाळावे.
- लहान वासरांची प्रतिकारशक्ती तितकीशी चांगली नसू शकते त्यामुळे ते रोगांना बळी पडतात. त्यामुळे त्यांची देखील विशेष काळजी घ्यावी.
- गोचीड, गोमाश्या, डास, माशा, चिलटे यांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक औषध फवारून घ्यावे.
- संध्याकाळच्या वेळी लिंबाचा पाला व शेणकुट याचा धूर करावा.
- शेण मलमूत्र सुद्धा गोठ्यात जादा वेळ न ठेवता गोठ्यापासून दूर कंपोस्ट खड्ड्यांमध्ये त्याची साठवणूक करावी.
इतके सर्व केल्यास आपण निश्चितपणे आपल्या पशुधनास अतिवृष्टी व पावसापासून सुरक्षित ठेवू शकतो यात शंका नाही.
- डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: पावसाळ्यात जनावरांमध्ये पोटफुगी कशामुळे? कसे कराल नियंत्रण