मालेगाव तालुक्यातील टाकळी येथे एक बैल लम्पीबाधित आढळल्याच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने खबरदारी घेत मंगळवारी (दि. ११) दिवसभरात ६०० जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी दिली.
टाकळी येथे बैलामध्ये लम्पीची लक्षणे दिसून आली होती. तपासणी करून रक्त नमुना पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने मंगळवारपासून जनावरांच्या लसीकरणाचे काम हाती घेतले आहे. जनावरांना गोट पॉक्स व्हॅक्सिन दिली जात आहे. टाकळीसह सौंदाणे परिसरात पाच किलोमीटरच्या अंतरात असलेल्या पशुपालकांच्या जनावरांसाठी १८०० लसी उपलब्ध आहे.
मागील वर्षी तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव झाला होता. साधारण १२ जनावरे बाधित झाली होती. तातडीच्या उपाययोजना करत एक लाख दहा हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले होते. सप्टेंबर २०२२ मध्ये तालुका लम्पीमुक्त झाला होता. तेव्हापासून एकही बाधित जनावरे आढळून आले नव्हते. पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले