राज्यभर लंपीचा प्रादुर्भाव वाढत असून उस्मानाबाद जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत 488 पशुधन बाधित झाल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले. लंपी त्वचारोगावर धडक लसीकरण मोहीम राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या असून जिल्ह्यात एकूण 101 पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये बाधित पशुधनावर उपचार करण्यात येत आहे.
सध्या जिल्ह्यात 120 सक्रिय बाधित पशुधन असून 55 गोवंश जनावरे मृत पावली आहेत. या आजाराची लक्षणे सौम्य असून उपचार आणि लसीकरणातून पशुधन बरे होत असल्याचेही पशुसंवर्धन विभागाने सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यात भूम, परंडा, वाशी, लोहारा, उमरगा, तुळजापूर व कळंब तालुक्यामध्ये एकूण तीन लाख 65 हजार 422 पशुधन असल्याचे पशुधन गणनेतून समोर येते.
तालुका | बाधित रुग्ण | बरे झालेले रुग्ण | सक्रीय रुग्ण | मृत पशुधन |
---|---|---|---|---|
उस्मानाबाद | ६८ | ३४ | २५ | ०९ |
परंडा | ३५ | १३ | १३ | ०९ |
लोहारा | १२ | ११ | ०१ | ० |
वाशी | ७२ | ४३ | २२ | ०७ |
तुळजापूर | ८१ | ६८ | ०९ | ०४ |
उमरगा | ४६ | ३४ | ०४ | ०८ |
कळंब | ११६ | ७५ | २९ | १२ |
भूम | ५८ | ३५ | १७ | ०६ |
एकूण | ४८८ | ३१३ | १२० | ५५ |
मृत पशुधनाच्या मालकास शासकीय निकषाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येते. यामध्ये मागील वर्षी झालेल्या लंपी प्रादुर्भावातील मृत जनावरांसाठी एकूण १००.२० लक्ष रक्कम जारी करण्यात आली होती. तर २०२३-२४ साठी ३.९६ लाख रक्कम अशी एकूण १०७.१६ लाख रक्कम देण्यात येणार आहे.
पशुपालकांनी गोठे फवारणी, आजारी पशुधन वेगळे ठेवणे अशा उपाययोजना करून हा आजार जनावरांमध्ये पसरण्यापासून रोखू शकता. तसेच पशुधनावर त्वरित उपचार करून लसीकरण करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.