अतुल जाधव
देवराष्ट्रे : गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजे ऐन उन्हाळ्यात गाय व म्हशीच्या दुधाच्या खरेदीत मोठी घट झाली. तरीही दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत व मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुधाचा मालक उपाशी आणि विक्रेते मात्र तुपाशी अशी अवस्था झाली आहे.
वाढत्या उन्हाळ्यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे, साहजिकच दुधाचे उत्पादनही घटत चालले आहे. तरीही दुधाच्या दरात वाढ होताना दिसत नाही. दुधाची कमतरता असतानाही दर स्थिर आहेत. दुग्धजन्य पदार्थांची विक्री मात्र वेगाने वाढली आहे.
उन्हाळ्यामुळे लस्सी, ताक, आइस्क्रीम, दही, श्रीखंड, आम्रखंड, पेढे यांची मागणी वाढली आहे. उत्पादकांनी त्यांची दरवाढ केली आहे. गाय व म्हशीच्या दुधाचे दर पडल्याने त्यांच्या खरेदी-विक्रीमध्येही घट झाली आहे. पशुधनाचा वाढता खर्च पाहता शेतकऱ्यांचे हात रिकामेच राहत आहेत.
दूध ४८ तर लस्सी १०० रुपये लिटर
- लस्सी १०० रुपये लिटर, दही ९० रुपये किलो, श्रीखंड २०० रुपये किलो, आम्रखंड १८० रुपये किलो, पेढे ५०० रुपये किलो, तूप ७०० रुपये किलो, ताक ४० रुपये लिटर यासह सर्व पदार्थाच्या किमती वाढत चालल्या आहेत.
- सध्या गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ३.५ व ८.५ स्निग्धांशासाठी २७ रुपये, तर म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर ४८ रुपये दर दिला जात आहे.
- दुग्धजन्य पदार्थाच्या किमती पाहता गाईच्या दुधासाठी ३५ रुपये व म्हशीच्या दुधासाठी ६० रुपये प्रतिलिटर दर अपेक्षित आहे. पणवाढीव दराची प्रतीक्षाच आहे.
अधिक वाचा: Milk Production उन्हामुळे दूध उत्पादन एक लाख लीटरने घटले