हरीश गुप्ता
नवी दिल्ली : स्टार्टअप्स इंडिया (Startup) ही योजना गेल्या काही वर्षापासून प्रभावीपणे राबविली जात आहे. त्यात यंदा तर महाराष्ट्रातील कृषी उद्योजक आघाडीवर आहेत. देशात कृषी क्षेत्रातील १ हजार ७०८ स्टार्टअप पैकी एकटया महाराष्ट्रात २२६ कंपन्या स्थापन झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यानंतर कर्नाटकचा (२११) क्रमांक आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरयाणा ही कृषिप्रधान राज्ये महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच मागे आहेत.
पंजाबमध्ये केवळ ५२ स्टार्टअप्स आहेत. हरीयाणामध्ये ८४ स्टार्टअप्स आहेत. देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या आणि मोठ्या प्रमाणावर शेतीवर आधारित असलेल्या उत्तर प्रदेशात ८६ स्टार्टअप्स आहेत. नवीन कृषी आणि ग्रामीण विकासमंत्री असलेले मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्या राज्यातही स्टार्टअप्सची संख्या ६८ इतकीच आहे. कृषी आणि संबंधित क्षेत्रातील कृषी स्टार्टअप्सना आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य देऊन कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने २०१८-१९ पासून एक योजना सुरू केली.
काय आहे योजना
या योजनेंतर्गत प्राथमिक टप्प्यात ५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थ साहाय्य दिले जाते, तसेच कृषी आणि संलग्न क्षेत्रातील उद्योजक/ स्टार्टअप्सना २५ लाख रुपयांपर्यंतचे साहाय्य दिले जाते. २०२३-२४ पासून सुरू होणा-या उद्योगांना ३ वर्षांसाठी ३०० कोटी रुपयांचा कृषी निधी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे भविष्यात अनेक उद्योजक निर्माण होतील.