Kojagiri Pournima 2024:
हिंगोली : कोजागरी पौर्णिमेला प्रसाद म्हणून दुधाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नागरिक दुधात केसर, मसाला टाकून घोटलेले गरमागरम दूध पिण्याचा आनंद घेतात. मागीलवर्षी कोजागरीच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहणामुळे नियोजन रद्द करावे लागले होते.
यंदा मात्र शहरांसह ग्रामीण भागातही कोजागरीचा उत्साह पहायला मिळाला. १६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील शहरी भागात जवळपास ७० ते ७५ हजार लिटर पॅकिंगसह खुल्या दुधाची विक्री झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे यंदाच्या कोजागिरी पौर्णिमा दुग्ध उत्पादकांची बंपर झाली असल्याचे लक्षात येते.
शरद ऋतूतील अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे कोजागरी १६ ऑक्टोबर रोजी जिल्हाभरात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. या दिवशी विविध मंदिरांसह ठिकठिकाणी केसर टाकलेले मसाला दुधाचे नियोजन करण्यात आले होते. तसेच धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले.
विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोजागरीला नेहमीच्या तुलनेत दोन ते तीन पटीने अधिक दुधाची विक्री झाली. काही नागरिकांनी तर दोन दिवस आधीपासूनच पॅकिंगसह सुटे दूध विक्रेत्यांकडे बुकिंग करण्यात आले होते. या दिवशी जवळपास ७० ते ७५ हजार लिटर दुधाची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
निम्म्याहून अधिक दूध पश्चिम महाराष्ट्रातून
जिल्ह्यात हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात ४० ते ५० हजार लिटर पॅकिंगसह खुल्या दुधाची दररोज विक्री होते. विक्री होणाऱ्या दुधापैकी पॅकिंगचे निम्याहून अधिक दूध पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, संगमनेर, कळंब, सोलापूर, बार्शी आदी ठिकाणांहून दाखल होते, असे दूध विक्रेत्यांनी सांगितले.
केशर, दूध, मसाल्याची मागणी वाढली
कोजागरीला केशर व मसाला टाकून दूध आटविण्याची परंपरा आहे. त्यामुळे दुधाबरोबर केशर व दूध मसाल्याची मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या बाजारात केशरचा दर २०० ते २२० रुपये प्रतिग्रॅम आहे. तर १०, २०, ३०, ५०, १०० रुपयांच्या पॅकेटमध्ये दूधमसाला उपलब्ध आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा चांगला प्रतिसाद...
गेल्यावर्षी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होते. त्यामुळे कोजागरीच्या आनंदावर एकप्रकारे विरजण पडले होते. परिणामी, दुधाची विक्री कमी झाली. यंदा मात्र एक दिवस अगोदरपासून दुधाची मागणी वाढली होती. ऐन वेळी दूध मिळणार नाही, म्हणून अनेकांनी बुकिंगही केली होती. एकंदरीत, गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात झाली.
कोजागरी पौर्णिमेला सकाळपासून दुधाच्या मागणीत वाढ झाली होती. शिवाय कोजागरी लक्षात घेता दूध कमी पडू नये म्हणून अधिकचे दूध मागविण्यात आले होते. - प्रतीक बांगर, दूध विक्रेता
गतवर्षीच्या तुलनेत यंदा दूध विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. मागणी लक्षात घेता मुबलक प्रमाणात दूध उपलब्ध ठेवले.- अजित यरमळ, दूध विक्रेता
जिल्ह्यात अशी झाली दुधाची विक्री (लिटरमध्ये)
हिंगोली | २५,००० |
वसमत | २०,००० |
कळमनुरी | १४,००० |
औंढा नागनाथ | १२,००० |
सेनगाव | १२,००० |