गोंदिया : शेतकऱ्यांचा आर्थिक उत्थान करण्यासाठी त्यांच्याकडील जनावरांची दूग्ध उत्पादन क्षमता वाढविली जाते. यासाठी गायी, म्हशींचे कृत्रिम रेतन केले जाते. या कृत्रिम रेतनातून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ७ हजार ८६५ संकरित वासरांचा जन्म झाला आहे. गोंदिया जिल्ह्याची दुग्ध उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग यासाठी प्रयत्न करीत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांत एकूण १९ हजार २०६ जनावरांचे कृत्रिम रेतन करण्यात आले. जिल्ह्यातील २३ हजार ७०६ गायी, म्हशींना गर्भारणा झाली असून, त्यांची नियमित तपासणी पशू संवर्धन विभागाकडून केली जात आहे. वंध्यत्व निवारणासाठी ११ हजार ७२६ जनावराची वंध्यत्व तपासणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करून उच्च वंशावळीचे जनावरे निर्माण करण्यावर पशू संवर्धन विभागाचा अधिक जोर आहे. साहीवाल, गीर, गवळाऊ, उच्च प्रतीच्या देशी गायी व म्हशींमध्ये मुर्रा जातीच्या जनावरांची निर्मिती करण्यात आली आहे.
९४ हजार प्रजननक्षम जनावरे
गोंदिया जिल्ह्यात ९४ हजार ५३९ जनावरे प्रजननक्षम आहेत. त्यात १९ हजार ३२३ म्हशी, तर ७५ हजार २१६ विविध प्रजातीच्या गायी प्रजननक्षम आहेत. तसेच आतापर्यंत ५ हजार ६९८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहेत, तर १ लाख १२ हजार ११८ जनावरांचा औषधोपचार पशू संवर्धन विभागाने केला आहे. ७८२ जनावरांच्या लहान, मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
३५ हजार किलो चारा बियाणे वाटप
जनावरांना उन्हाळ्यातही हिरवा चारा मिळावा, त्यातून दूध उत्पादन वाढेल या हेतूने शेतकऱ्यांना ३५ हजार २९७ किलो चायाची बियाणे वाटप करण्यात आली आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून घेतलेली चाऱ्याची बियाणे शेतकऱ्यांनी शेतात लावली आहेत. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने एक बांधी जनावरांच्या चाऱ्यासाठी राखून ठेवली आहे.
कृत्रिम रेतन कशासाठी ?
कृत्रिम रेतन ही पाळीव प्राण्यांसाठी, बहुत करून दुधाळू जनावरांच्या, कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरण्यात येणारी एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये वळूचे अथवा रेड्याचे (नर पशू) वीर्य (रेतन) संकलन करून ते योग्य प्रक्रिया करून साठविले जाते. नंतर त्याद्वारे गाय, म्हैस, अशाप्रकारच्या दुधाळू जनावरांचे 'फलन' केल्या जाते. या रितीच्या वापरण्याने, चांगल्या दर्जाची पशूसंतती निर्माण होते. पशूपालनात आणि पशूंवर आधारित व्यवसाय करणाऱ्यांना ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते.