नाशिक : एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा पारा वाढत असल्याने, यामधून जनावरेही सुटत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा उन्हात जनावरांना पाणी पाजण्यासाठी हौद असेल तर त्यात गुळ व मीठ टाकून पाणी पाजावे. या उन्हामुळे जनावरांना उष्माघाताचा धोका संभवत असल्याने जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.
नाशिकसह जिल्ह्यात वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्यात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहत असून, गत चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या झळा कमी झाल्याचे दिसून येते. येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज असल्याने जनावरांचे आरोग्य जपण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाकडून दिला जात आहे. सध्या तालुक्यातील वातावरणात बदल होत असून, ऊन-सावलीचा खेळ सुरू असला तरी उष्णता मात्र कायम आहे. तापमान आणि उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. म्हशींना पाण्यात डुंबण्याची सोय असल्यास पाण्यात सोडावे. पाणी पाजण्यासाठी हौद असेल तर त्यात गुळ व मीठ टाकून काठीने ढवळावे, यातून उन्हामुळे येणारा अशक्तपणा कमी होण्यास मदत होते, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिला.
यंदा कडक ऊन्हाळा असल्याने आणि सातत्याने ऊन्हाची लाट येत असल्याने मुक्या प्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. जनावरांच्या आरोग्याच्या संदर्भात फारशी काळजी घेतली जात नसल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ग्रामीण भागात फार थोड्या शेतकऱ्यांकडून जनावरांच्या गोठ्याचे व्यवस्थापन केले जाते. त्यानुसार असे शेतकरी ऊन्हापासून जनावरांचे संरक्षण करण्याची काळजी देखील घेतात. परंतु बहुतांश शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांच्या जनावरांना उष्माघाताचा त्रास सुरू होतो. याची कल्पनाही त्यांना नसते. याबाबत शेतकऱ्यांमध्ये तसेच पशुपालकांमध्ये जागरूकता होण्याची गरज आहे.
जनावरांच्या उष्माघाताची लक्षणे काय?
जनावरे अस्वस्थ होतात तसेच जनावरांची तहान-भूक मंदावते.
जनावरे कोणतीही हालचाल न करता बसून राहतात.
पशूना ८ ते १० तासानंतर अतिसार होण्याची शक्यता बळावते.
श्वासोच्छवासाचा दर वाढून धाप लागल्यासारखे होते.
डोळे लालसर होऊन डोळ्यांतून पाणी गळायला लागते.
हे करा उपाय
गोठ्यामध्ये भरपूर खेळती हवा असावी, गोठ्यात अधूनमधून पाणी फवारावे.
गोठ्याच्या छतावर पालापाचोळा, गवत टाकून त्यावर पाणी शिंपडावे, त्यामुळे गोठा परिसर थंड राहतो.
म्हशींमध्ये घामग्रंथींची संख्या कमी असल्यामुळे शरीराचे तापमान कमी करण्यासाठी किंवा थंड ठेवण्यासाठी म्हशींना पाण्यात काही वेळेसाठी डांबून ठेवणे.
म्हशींचा निसर्गतः रंग काळा असून, कातडीही जाड असते. उन्हाची तीव्रता वाढली की कातडी लगेच तापते.
सकाळी ११:०० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४:०० नंतर जनावरे चरण्यासाठी सोडावी. दुपारच्या उन्हात जनावरे सावलीत बांधावी. दुपारी हिरवा मका, लसूण घास यांसारखी पोषण वैरण द्यावी.
तालुक्यात उन्हाचा कडाका वाढत असून, आता मात्र काही दिवसांपासून वातावरण थंड आहे. मात्र, ढगाळ वातावरण निवळताच ऊन आणखी तापणार आहे, हे निश्चित. त्यामुळे जनावरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका असल्याने पशुपालकांनी काळजी घ्यावी. जनावरांना वेळोवेळी पाणी, चारा सावलीत करा. - डॉ. किरण वाघ, पशुवैद्यकीय अधिकारी