'महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कल फलोत्पादनाकडे वाढला आहे. त्यामुळे फळांची शेती वाढली आहे. मात्र जे ग्राहकांपर्यंत पोहचायला हवं, ते पोहचताना दिसत नाही. त्यामुळे ही पुरवठा साखळी मजबूत होणं आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यानंतरच्या माध्यमांनी जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत उत्पादन कसं पोहचेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील इतर संस्थांना हाताशी धरून देशभरातील ग्राहकापर्यंत उत्पादन पोहचविण्यासाठी सप्लाय चेन मजबूत बनविण्यावर भर द्यायला हवा' असा सुर फलोत्पादन परिषदेत आयोजित चर्चा सत्रात ऐकायला मिळाला.
नाशिक येथील सह्याद्री फार्म्स यांच्या माध्यमातून दोन दिवशीय फ्रेश इंडिया फलोत्पादन परिषद आयोजित करण्यात आली आहे. आज फलोत्पादन आणि भविष्यातील ट्रेंड या विषयावर चर्चा सत्र पार पडले. यात फलोत्पादन वाढत असताना सप्लाय किती महत्वाची आहे, हे या चर्चा स्तरातून समोर आले. या चर्चा सत्रात सह्याद्री फार्म कार्यकारी संचालक अझहर तांबुवाला, सॅम ऍग्री गटाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, जीव्हीके नायडू, महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, फ्रेशट्रॉप फ्रुट ग्रुपचे सीएमडी अशोक मोतियानी, के बी एक्सपोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक कौशल खक्कर आदी उपस्थित होते.
यावेळी सुरवातीलाच महाराष्ट्रासह इतर काही राज्यात फलोत्पादन वाढल्याचे सांगण्यात आले. इतर पिकासोबतच, अन्नधान्याबरोबरच फळबागही देशात सातत्याने विक्रमी उत्पादन नोंदवत आहे, जे आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचे, शेतकऱ्यांच्या योग्य व्यवस्थापनाचे चांगले फळ आहे. काही फळे इतर देशांत निर्यात केली जातात. काही फळे इतर राज्यात वितरित केली जातात. हे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. अनेक फळे निर्यात केली जातात, मात्र हीच फळे देशातील ग्राहकांचे मिळत नसल्याचे वास्तव आहे. अशावेळी शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठांमध्येच अधिकाधिक आर्थिक पाठबळ मिळणे सोयीस्कर होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर जीव्हीके नायडू म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने द्राक्ष शेती केली जात आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. अतिशय मेहनत करून शेतकरी द्राक्ष शेती करत आहे. आमच्याही भागात द्राक्ष शेती व्हायला हवी अशी मनोमन इच्छा आहे, अनेक नागरिकांना द्राक्ष खायला मिळत नसल्याचे दिसून आले. मात्र महाराष्ट्रात द्राक्षांची कमी नाही, म्हणून हे पीक आमच्याही भागात होणं गरजेचे आहे. किंवा या पिकाला देशांतर्गत बाजारपेठांमध्ये अधिकाधिक पुरवठा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुरवठा साखळीत शेतकरी केंद्रबिंदू
तर फ्रेशट्रॉप फ्रुट ग्रुपचे सीएमडी अशोक मोतियानी सप्लाय चेन मध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून असतो. मात्र अशावेळी शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या पिकाचा भाव हा बाजारात ठरविला जातो. शेतकऱ्यांना त्याच्या मालाचा भाव ठरविता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक पिकावर फोकस करावा, पिकाची उत्पादकता चांगली करावी, त्यानंतर देशांतर्गत विक्रीसाठी प्रयत्न करावा, बाजारपेठांमध्ये आपलं उत्पादन कसं उपलब्ध होईल, याकडे लक्ष द्यावं, ग्राहकांना आपल्या उत्पादनाकडे कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करावा, असे मोतियानी म्हणाले.
फ्रुट क्लस्टरसाठी प्रयत्न
के बी एक्सपोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक कौशल खक्कर म्हणाले की, फलोत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेकदा बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. अशावेळी उत्पादित केलेले पीक स्टोअर करून ठेवणे, किंवा त्यावर प्रक्रिया करणे महत्वाचे ठरते. काही खासगी कंपन्यांशी करार करून यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होईल. शिवाय शेतकऱ्यांना पाठबळ मिळाल्यानंतर अधिक चांगलं उत्पादन मिळण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक
यावेळी उपस्थित असलेले महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी द्राक्ष शेतीबाबत म्हणाले की, एकट्या महाराष्ट्रात 32 लाख मेट्रिक टन द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यातून केवळ 2 लाख मेट्रिक टन निर्यात केली जाते. तर उर्वरीत द्राक्षाचं काय होत? कारण देशभरातील अनेक राज्यात आजही ग्राहकांची मागणी असते. मात्र द्राक्ष पोहचत नाहीत. अशावेळी द्राक्ष देशभरात पोहचण्यासाठी प्रोमोशन होणं गरजेचे आहे. द्राक्षग शेतीत अधिकाधिक वाणांची निर्मिती झाली पाहिजे. मात्र दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. यासाठी इटली, फ्रांस सारख्या देशांनी ज्या पद्धतीने क्रॉप कव्हरसाठी प्रयत्न केले आहेत. असे प्रयत्न आपल्या इथे करायला हवे. यासाठी सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे भोसले म्हणाले.