देशभरात मत्स्यपालन व्यवसाय हळूहळू वाढू लागला आहे. शिवाय देशभरातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मत्स्यपालन हे उत्पन्नाचे उत्तम साधन आहे. या भागाच्या विकासासाठी शासन नवनवीन योजनाही आणत आहे. याच पार्श्वभूमीवर मत्स्यशेतीबाबत योग्य माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी मत्स्य सेतू ॲप केंद्र सरकारने सुरू केले आहे. ज्या माध्यमातून मत्स्य पालनासंदर्भात हरेक गोष्टीची माहिती उपलब्ध होत आहे.
मत्स्यपालन हा तलावात किंवा इतर बंद पाण्यात मासे वाढवून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय आहे. हळूहळू या क्षेत्राकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला असून शेतकऱ्यांना माहितीसाठी शासनाच्या माध्यमातून मत्स्य सेतू अँप सुरु करण्यात आले आहे. हे ॲप नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड (NFDB) आणि ICAR-Central Institute of Freshwater Aquaculture यांनी विकसित केले आहे. मासे उत्पादन करण्यात भारतही अग्रेसर असून देशाच्या GDP मध्ये मत्स्यव्यवसाय क्षेत्राची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी, सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मोठी गुंतवणूक देखील केली आहे.
मत्स्य सेतू ॲपची वैशिष्ट्ये..
विविध माशांच्या प्रजाती शिकवणाऱ्या ऑनलाइन कोर्स मॉड्यूलची सुविधा देण्यात आली आहे. कार्प, कॅटफिश, स्कॅम्पी यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या माशांचे प्रजनन, बीजोत्पादन आणि विकास याबद्दल माहिती देणे. पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी माहिती देणे. छोट्या व्हिडीओद्वारे मत्स्यपालनाची माहिती देणे. समस्यांचे निराकरण या ॲपद्वारे मिळेल. प्रत्येक कोर्स मॉड्यूल यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर तुम्हाला ई-प्रमाणपत्र मिळू शकते. याशिवाय मत्स्यपालक आपल्या शंकांचे निरसन ॲपद्वारे करू शकतात आणि तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकतात.
अँप कसे सुरु करावे?
आपण कोणत्याही स्मार्टफोनच्या गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करू शकतो. इंस्टॉलेशननंतर ॲपचे पहिले पेज उघडेल. येथे, खाते तयार करा पर्यायावर जाऊन, आपण विनंती केलेल्या माहितीनुसार नोंदणी करू शकता. अकाऊंट तयार झाल्यानंतर तुम्ही त्यावर दिलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता.