सध्या वातावरणात कमालीचा बदल होतो आहे. उन्हामध्ये चांगलीच वाढ होत असल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
- जनावरांमध्ये गोचीड, जुलाब, लाळ्या खुरकुत यांचा त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
- दोन लिटर पाण्यात अर्धा किलो तंबाखुची भुकटी रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी थोडं झाकण ठेऊन उकळावी. थंड झाल्यावर वस्त्रगाळ करून पन्नास लिटर पाण्यात मिसळून गोठा आणि परिसरात दर पंधरा दिवसांनी फवारणी करावी.
- जनावरांना रोग प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी लसीकरण करून घ्यावे.
- दुभत्या जनावरांना कासदाह किंवा कास सुजन होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी दूध काढल्यावर जनावरांचे चारही सड जंतूनाशक द्रावणाने धुवावेत आणि जनावर एक तासभर जमिनीवर बसणार नाही याची काळजी घ्यावी.
- म्हैस पालनाचा विचार करताना पंढरपुरी आणि नागपुरी जातीची निवड करावी. पंढरपुरी म्हैस भरपूर दूध देते आणि नागपुरी म्हशीमध्ये उष्ण हवामानात तग धरून दूध देण्याची क्षमता असते.
- शेळीपालन करताना जमनापुरी, संगमनेरी, सिरोही, सुरती, बीटल, उस्मानाबादी या प्रजातींची निवड करावी.
- शेळ्यांना स्वच्छ व मुबलक पाणी तसेच प्रथिन आणि क्षारयुक्त खाद्य द्यावे. गुरांचे उन्हापासून संरक्षण करावे. जनावरांच्या आहारात फॉस्फरसचे योग्य प्रमाण ठेवल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी करणे शक्य होते.
- जनावरांना चारा किंवा गवत देण्या अगोदर त्यातून एखादा लोहचुंबक फिरविल्यास लोखंडी वस्तू जनावरांच्या तोंडात जाण्याअगोदर बाहेर काढता येतील.
- उन्हाळ्यासाठी हिरव्या चाऱ्याचे व मूरघासाचे नियोजन करावे. उन्हाळी मक्याची लागवड करावी, यासाठी गंगा-१०१, मांजरी कम्पोझीट, आफ्रिकन टॉल इत्यादी वाणांची निवड करावी.
- हिरव्या वैरणीकरिता ज्वारीची कापणी पीक ५०% फुलोऱ्यात असताना करावी. या वैरणीत प्रथिनांचे प्रमाण- ७.८% खनिजे ९.८% आणि पिष्टमय पदार्थ ४३.३% असतात.
अधिक वाचा: दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी