अनेक पशुपालक आपली गाय-म्हैस वेळेवर गाभण राहावी यासाठी खूप प्रयत्नशील असतात. 'वर्षाला एक वेत व्हायलाच पाहिजे' असं दुग्ध व्यवसायातील अर्थशास्त्र सांगते ते खरं आहे.
त्यासाठी पशुपालक नेहमी वेळेवर जनावर गाभण राहण्यासाठी प्रयत्न करतात, धडपडतात.. वेळेवर गाई, म्हशी गाभण राहण्यासाठी नेमकं कृत्रिम वेतन कधी करून घेऊ नये हे माहित असणं अत्यंत आवश्यक आहे.
- अनेक वेळा कालवडी, रेड्या लवकर गाभण राहाव्यात म्हणून त्यांचा पहिला किंवा दुसरा माज दिसल्यावर तात्काळ कृत्रिम रेतन करून घेण्याकडे पशुपालकांचा कल असतो तो टाळला पाहिजे.
- त्याचबरोबर गाई-म्हशी व्याल्यानंतर खरोखरच जर व्यवस्थापनाचा दर्जा व त्याचं विनं सुखरूप झालं असेल तर नवव्या किंवा दहाव्या दिवसांनी, जास्तीत जास्त महिनाभरात त्या माजावर येतात. अशावेळी देखील कृत्रिम वेतन करून घेऊ नये.
- अनेक वेळा गाई-म्हशी १७-१८ दिवसात किंवा २४-२५ दिवसातच माजाची लक्षणे दाखवतात अशावेळी देखील कृत्रिम वेतन टाळावे.
- काही वेळा कृत्रिम वेतन केल्यानंतर पुन्हा दोन-चार दिवसात माजाची लक्षणे दाखवली जातात अशा वेळी देखील कृत्रिम वेतन करून घेऊ नये.
- नेहमी दुग्ध व्यवसायात आपला शास्त्रीय दृष्टिकोन असला पाहिजे. अनेक वेळा आपल्या गोठ्यातील गाई-म्हशींच्या दूध उत्पादनानुसार रेतमात्रा जर उपलब्ध नसतील तर आहे त्या रेतमात्रा वापरून कृत्रिम रेतन न करून घेता तो माज वाया गेला तरी चालेल. योग्य रेतमात्राची मागणी करून पुढील वेळी कृत्रिम वेतन करून घ्यावे. जेणेकरून पैदास धोरण बिघडणार नाही.
- अनेक वेळा गाई म्हशींचा सोट खराब असतो तो धुरकट, पिवळसर असेल आणि संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृत्रिम रेतन नको म्हणून सांगितल्यास सहमती दर्शवून योग्य उपचार करून घ्यावेत.
- एखादी गाय किंवा म्हैस नियमित तीन वेळा जर कृत्रिम रेतन करून उलटत असेल, गाभण राहत नसेल तर मात्र योग्य त्या उपचाराचा आग्रह धरावा.
- जर दोन वेळा कृत्रिम वेतन करायचे असेल तर मात्र २४ तासाच्या आत दुसरे कृत्रिम रेतन करता कामा नये.
- जर यदा कदाचित रक्तस्त्राव झाला असेल तर त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कृत्रिम रेतन टाळले पाहिजे.
- गर्भाशय मुख जर वक्र असेल आणि त्याबाबत जर पशुवैद्यकांनी सल्ला दिला तर कृत्रिम रेतन करून न घेता त्याला नैसर्गिक रेतनासाठी खोंड किंवा रेड्याकडे घेऊन जावे.
- योग्य माजावर नसलेल्या गाई-म्हशींच्या कृत्रिम रेतनासाठी आग्रह धरू नये.
- या सर्वांसाठी आपल्या गोठ्यात नियमित एकाच, तज्ञ पशुवैद्यकाकडून अथवा सेवादात्याकडून कृत्रिम रेतन करून घेणे आवश्यक आहे.
अधिक वाचा: कसा ओळखाल जनावरांतील माज व कधी कराल कृत्रिम रेतन
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली