समर्थ भांड
मागील दीड महिन्यापासून वेळेत पाऊस होत आहे. पावसाळ्यात माणसांना होणाऱ्या आजारांप्रमाणे जनावरांच्या आजाराची संख्यादेखील वाढत असते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जिल्हा पशुवैद्यकीय कार्यालयाकडे लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून, लसीकरण सुरू आहे.
जनावरांना आजारांची लागण होऊ नये यासाठी लम्पी चर्म, लाल। खुरकत या प्रमुख आजारासह इतर आजारांसाठी लसीच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सध्या परभणी जिल्ह्यात ४ लाख ९६ हजार इतकी गाय वर्गातील जनावरांची संख्या आहे. मात्र, फऱ्या, घटसर्प या आजारांसाठी ३ लाख ५६ हजार लसीच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, तर लम्पी चर्म आजारासाठी ३ लाख ९७ हजार १०० लसीच्या मात्रा मिळाल्या असून, दोन टप्प्यांत हे लसीकरण होणार आहे.
सध्या थैमान घातलेल्या लाल खुरकत या आजारासाठी जिल्ह्यासाठी ७ लाख ७७ हजार इतक्या लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजारांची लागण होण्याची वाट न बघता शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे पावसाळ्यात लसीकरण करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग करीत आहे.
लम्पीचा धोका वाढलेलाच; दोनदा होणार लसीकरण
यावर्षीदेखी लम्पी आजाराचा धोका कायम आहे. यामुळे शासनाकडून मोफत दोन वेळा प्रत्येक जनावरांचे लसीकरण होणार आहे. परभणी जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत ३ लाख ९३ हजार ३१० जनावरांना लसीच्या मात्रा टोचण्यात आल्या आहेत. यासाठी ३ लाख ९७ हजार १०० मात्रा आल्या होत्या. दरम्यान, मोफत लसीकरण करून घेणे प्रत्येक पशुपालकांची जबाबदारी आहे.
जनावरे पाच लाख; पण लसीच्या मात्रा चार लाख
जिल्ह्यातील गाय वर्गातील जनावरांची संख्या (२० व्या पशुगणनेनुसार) ४ लाख ९६ हजार इतकी आहे, परंतु, या तुलनेत सगळ्या लसीकरणाच्या मात्रा ३ लाख ९७ हजार, ३ लाख ५७ हजार आलेल्या आहेत. यामुळे इतर एक ते दीड लाख जनावरांच्या लसीकरणाचे काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून दाखल झालेल्या लसीकरणांतर्गत ९९ टक्के लसीकरण केले आहे.
जिल्ह्याला पशुधनासाठी किती लसीच्या मात्रा मिळाल्या ?
आजाराचा प्रकार | उपलब्ध मात्रा | झालेले लसीकरण |
लम्पी चर्मरोग | ३९७१०० | ३९३३१० |
घटसर्प, फऱ्या | ३५६००० | ३५३८६४ |
लाळ खुरकत | ७७७५०० | ७६२४५२ |
आंतरविषार | १८४००० | १८२९३० |
पशुसंवर्धन विभागाला उपलब्ध लसीच्या मात्रांपैकी आमच्याकडून ९९ टक्के इतके लसीकरण झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरण झालेले नाही, त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाला कळवावे, त्यांना सहकार्य केले जात आहे. - विजय देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, बीड.
हेही वाचा - Detection of mastitis in bovines 'या' किटच्या मदतीने घरीच करा मस्टायटीसची तपासणी