महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई अर्थात महानंद आता इतिहास जमा होताना दिसत आहे. महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात आला आहे.
महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया २ मे रोजी पूर्ण झाली आहे. मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी २५३ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंद डेअरी इतिहास जमा झाली आहे. महाराष्ट्रातील या प्रसिद्ध डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीने कब्जा मिळवला आहे. महानंदची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यानंतर पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी मदर डेअरीला चालवण्यास देण्याचा निर्णय झाला होता.
महानंद दूध ही राज्यातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेत होता. महानंदचे संचालक आणि कर्मचाऱ्यांनीही महानंदच्या हस्तांतरणाला विरोध केला होता.
तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाकडून 'महानंद'चे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्यावेळी लेखापरीक्षकांनी 'महानंद'च्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते.
मालमत्तेमध्ये दिवसेंदिवस होणारी घट, वाढत चाललेला तोटा, आर्थिक टंचाई, नावीन्याचा अभाव, कर्मचाऱ्यांची भरती, यामुळे महानंद' तोट्यात गेला असून, आणखी काही काळानंतर तो चालविणे अशक्य होणार असल्याचा इशारा लेखापरीक्षकांनी दिलेला होता.
पूर्वीचा शासन निर्णय अधिक वाचा : महानंदची घडी बसणार; पुढील ५ वर्षांचे व्यवस्थापन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे