ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी महिंद्राने १५ ऑगस्ट रोजी हलक्या वजनाचे सात ट्रॅक्टर जगासमोर आणले आहेत. हे सर्व ट्रॅक्टर सिंगल सीटर असून ओजा तंत्राद्यानाचे आहेत. यामुळे फळबाग आणि शेती मशागतीच्या कामांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये या हलक्या किंवा कमी वजनाच्या ट्रॅक्टरचे उद्घाटन करण्यात आले असून भारत,जपान, दक्षिण पूर्व आशिया आणि अमेरिका या देशांमधील शेतकऱ्यांच्या दृष्टीने या ट्रॅक्टरची रचना करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना शेतीतील मजबूत काम या ट्रॅक्टरच्या माध्यमातून करता येणार असून सर्व ट्रॅक्टर औद्योगिक सुविधांवर आधारित आहेत. हे सर्व ट्रॅक्टर 'ओजा' तंत्रज्ञानाचे असून द्राक्षबागा, फळबागा, भाजीपाला, तसेच भात शेतीसाठीही फायद्याचे ठरणार आहेत.
ओजा तंत्रज्ञान म्हणजे काय ?
संस्कृतमधील ओजस या शब्दापासून या तंत्रज्ञानाला 'ओजा' असे नाव देण्यात आले आहे. ज्याचा अर्थ ऊर्जा असा होतो. शेतीतील मशागतीच्या कामांमध्ये हे ट्रॅक्टर चांगला पर्याय ठरू शकतो.
यामध्ये महिंद्रा कंपनीने चार उपट्रॅक्टरही लॉन्च केले असून सब कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट, स्मॉल युटिलिटी आणि लार्ज युटीलिटी अशा या ट्रॅक्टरच्या विभागण्या करण्यात आल्या आहेत. या तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावरील प्रगत ट्रॅक्टर असे ही कंपनी संबोधत आहे.
हलक्या वजनाचे ट्रॅक्टर शेतकऱ्याला फायदेशीर
ट्रॅक्टरचा वापर करत असताना अधिक वजनाच्या ट्रॅक्टरमुळे जमिनीवर मोठा परिणाम होतो. त्यात प्रामुख्याने जमिनी टणक होणे परिणामी पाण्याचा निचरा कमी होणे तसेच अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरही त्याचा परिणाम होताना दिसतो. एका पिकासाठी किमान ४ ते ५ वेळा ट्रॅक्टर आपल्याला शेतातून फिरवावा लागतो अशावेळी हलक्या व कमी वजनाचे ट्रॅक्टर फायदेशीर ठरू शकतील.
इंजिन क्षमता व किंमत
हे सगळी ट्रॅक्टर २१ एचपी ते ७० एचपी पॉवर क्षमतेचे आहेत. या ट्रॅक्टरंना ओजा २१२१, ओजा २१२४ , ओजा २१२७ , ओजा २१३० , ओजा ३१३२ आणि ओजा ३१२० व इतर काही नावे देण्यात आलेली आहेत.
यामधील ओझा २१२७ या ट्रॅक्टरची किंमत पाच लाख ६४ हजार पाचशे रुपये सांगण्यात येत आहे. तर ओजा ३१४० या ट्रॅक्टरची किंमत सात लाख ३५ हजार रुपये आहे.