दूध संकलन करताना वजन काट्यात फेरफार करणे, फॅट तपासणीसाठी २० मि.लि. पेक्षा अधिक दूध घेणाऱ्या करवीर, पन्हाळा व शिरोळ तालुक्यांतील १६ दूध संस्थांना सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी बुधवारी नोटिसा बजावल्या आहेत. आठ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले असून, अपेक्षित खुलाशासह दुरुस्ती केली नाहीतर थेट प्रशासक नेमण्याची कारवाई केली जाणार आहे.
शासनाच्या नियमानुसार १० मि.लि. अचूकतेचे इलेक्ट्रॉनिक वजन-काटे वापरणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर दूध फॅटसाठी २० मि.लि दूध घेऊन तपासणी केल्यानंतर ते दूध परत देणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाचा प्राथमिक दूध संस्था पालन करीत नसल्याच्या तक्रारी दुग्ध विभागाकडे आल्या आहेत.
अधिक वाचा: फॅट काढण्यासाठी जादा दूध घेणाऱ्या संस्थांवर होणार कारवाई
दुग्ध विभागाने गेले दोन दिवस करवीर, शिरोळ, पन्हाळा तालुक्यांतील संस्थांचे संकलन सुरू असताना अचानक तपासणी केली असता सोळा संस्थांमध्ये नियमबाह्य संकलन सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांना बुधवारी नोटिसा काढल्या असून आठवड्यात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अशी होऊ शकते कारवाई...
नोटिसीला योग्य प्रकारे खुलासा दिला पाहिजे. खुलाशानुसार दोष दुरुस्ती करून त्याची अंमलबजावणी केली नाहीतर कलम ७९ अंतर्गत कारवाई होऊ शकते. त्यातूनही न ऐकणाऱ्या संस्थांवर कलम ७८ नुसार प्रशासक नियुक्त्ती होऊ शकते.
दूध संस्थांची तपासणी केल्यानंतर गंभीर बाबी समोर आल्या, कायद्याचे तंतोतंत पालन न करणाऱ्या संस्थांवर थेट कारवाई केली जाईल. - प्रदीप मालगावे, सहायक निबंधक, दुग्ध