दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिक जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. सिन्नरमध्ये दूध भेसळ लक्षात आली असली तरी जिल्ह्यात अनेक भागांत अशाप्रकारची भेसळ होत असल्याचा संशय आहे. मात्र, पुरेशी यंत्रणा नसल्याने दूध भेसळीची तपासणी वेळोवेळी होत नाही. त्यामुळे आता टेस्टिंग व्हॅन सुरू करण्यात येणार आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी लवकरच मोबाईल टेस्टिंग व्हॅनच्या माध्यमातून तपासणी करण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. गुजरात राज्यातून येणारा खवा, मावा व इतर दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पारधे यांनी कळविले. लहान मुलांच्या व ग्राहकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी सर्व दूध विक्रेते, स्वीट मार्टधारक, किरकोळ दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे यांनी दध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतांना ते पदार्थ उच्च गुणप्रतीचे, भेसळविरहीत व पदार्थांवर मुदतपूर्व दिनांक नमूद असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
पथकांमार्फत तपासणी करण्यात आलेले दूध व दुग्धजन्य पदार्थ कमी गुणप्रतीचे, भेसळयुक्त व मुदतपूर्व दिनांक नमूद नसल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्या बैठकीत ठरविण्यात आल्याचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी वाय. आर. नागरे यांनी कळविले आहे.
विक्रेत्यांना आवाहन
जिल्ह्यातील दूध विक्रेत्यांनी उच्च गुण प्रतीचे, भेसळविरहीत दूध व दुग्धजन्य पदार्थांचीच विक्री करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पारधे यांनी केले आहे.