पोल्ट्री व्यवसायात वर्षानुवर्ष कोंबड्यांच्या आहारात सोयाबीन वापरले जाते. उच्च दर्जाची प्रथिने अमिनो ऍसिड आणि तेलाचा समृद्ध स्त्रोत असणारा उत्तम स्राेत म्हणून कुक्कुटपालनात सोयाबीनला पाहिले जाते. अनेक अभ्यासामधून असे समोर येते की योग्यरित्या प्रक्रिया केलेले संपूर्ण सोयाबीन पशुधन रेशनमध्ये कार्यक्षमतेने वापरले जाऊ शकते.
जगभरात मांस खाणाऱ्या लोकसंख्येसाठी प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून या व्यवसायाकडे पाहण्यात येते. भारतीय शेतीत कुक्कुटपालन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. 2011 ते 2020 पर्यंत कुक्कुट मांसाचे उत्पादन सरासरी 10.9 दराने वाढल्याचे सांगण्यात येते. कुक्कुटपालनात त्या पक्षाच्या किंवा प्राण्याच्या वाढीसाठी पुनरुत्पादनासाठी व एकूण आरोग्यासाठी त्याला पोषक खनिजे, जीवनसत्वे, कर्बोदके, प्रथिने आणि पाण्याची गरज असते.
यासाठी मुख्य धान्य म्हणून सोयाबीनचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सोयाबीनच्या बाजारभावाचा पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम होतो. सोयाबीनची पेंड किंवा खाद्य घटकांमध्ये झालेली कच्च्या मालाची किंमत या व्यवसायावर परिणाम करते. याशिवाय महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सोयाबीन उत्पादक राज्य आहे. दरवर्षी साधारण 48 लाख 25 हजार टन सोयाबीन उत्पादन राज्यात होते. महाराष्ट्रातले अनेक शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, पशुपालन, डेअरी व्यवसाय करतात.
जगभरातील मांस बाजारपेठेचा ट्रेंड लक्षात घेता, मांस सुरक्षितता व अन्नसुरक्षेच्या संबंधित चिंतांमुळे कुक्कुटपालन उद्योगाच्या वाढीला चालना देणारा निरोगी जनावरांचा आहार हा महत्त्वाचा प्रश्न बनत आहे. परिणामी जनावराचे किंवा कुक्कुट प्राण्याच्या आरोग्याची आहारातून काळजी घेण्याचे प्रयत्नही वाढत आहेत. जगभरात प्राण्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले जात असताना दर्जेदार अन्न उपलब्ध झाल्याने प्राण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांची गरज बाजारातील मागणी वाढवेल असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.
एकीकडे शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याची ओरड होत असताना सोयाबीन साठवणूक करताना शेतकरी दिसतात. तर दुसरीकडे पोल्ट्री व्यवसायाला लागणारी सोयाबीनची आवश्यकता वाढती आहे. देशात, राज्यात पोल्ट्री व्यवसायासाठी खाद्य तयार करणारे अनेक व्यवसाय आहेत. ज्यांना हे खाद्य तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागते. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायासाठी लागणाऱ्या खाद्य प्रक्रिया उद्योगात सोयाबीन विक्री करण्यास मोठी संधी आहे.
पोल्ट्री फीडसाठी प्रिमिक्स हे पोल्ट्री चे पोषण वाढविण्यासाठी महत्त्वाचे मानले जात असून पोल्ट्री बाजारपेठेत अशा प्रिमिक्स बनवणारी बाजारपेठ लोकप्रिय होत आहे. उत्तर अमेरिका युरोप दक्षिण अमेरिका आशिया पॅसिफिक मध्यपूर्व आणि आफ्रिका हे पोल्ट्री बाजारपेठेत प्रीमिक्स चा वाटा असलेलं मोठे मार्केट म्हणून उदयास आले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायातील सोयाबीनचे महत्व अधोरेखित होत असून शेतकऱ्यांना व्यवसाय संधी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.