कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा. ज्याची ते आतुरतेने वाट पाहत असतात. समुद्र आणि कोळी बांधव यांचे नाते अतूट आहे. समुद्रात मिळालेल्या माशांची विक्री करून आपला उदरनिर्वाह हे कोळीबांधव करत असतात.
पावसाच्या तोंडावर मासेमारी बंद झाल्यानंतर त्यांचे लक्ष लागून राहते ते नारळी पौर्णिमा या सणाकडे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमार आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात.
नारळी पौर्णिमा सणादिवशी कोळीबांधवांचा आनंद ओसंडून वाहत असतो. सणासाठी कपड्यांची खरेदीही होते. दुपारच्या जेवणात खूप काही पंचपक्वान्न नसले तरी गोड पदार्थ असतोच.
जसजशी दुपार होऊन जाते तसतशी हा सण आणखीनच रंगतदार व्हायला सुरुवात होते. खरेदी केलेले भरजरी कपडे घालून किंवा आपला पारंपरिक कोळी समाजाचा पोशाख घालून कोळी बांधव-भगिनी समुद्राच्या दिशेने यायला सुरुवात करतात.
समुद्राच्या ठिकाणी येऊन नारळाची विधिवत पूजा करून तो समुद्राला अर्पण करताना त्यांच्यात निर्माण झालेला एक वेगळाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. वेंगुर्ला तालुक्याला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे.
वेंगुर्ला बंदर, वेळागर अशा ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फक्त कोळीबांधवच नाहीतर सर्व समाजाचे लोक या सणामध्ये सहभागी होऊन आनंद लुटतात.
पूर्वीच्या काळी सावंतवाडी संस्थानचे राजे वेंगुर्ला बंदरावर येऊन मानाचा पहिला नारळ समुद्राला अर्पण करायचे. त्यानंतर कोळी बांधव-भगिनी मिरवणुकीने बंदरावर येऊन नारळाची पूजा करून तो समुद्राला अर्पण करायचा.
कालांतराने ही प्रथा बंद झाली. आता फक्त वेंगुर्ला नगरपरिषद आणि वेंगुर्ला पोलिस स्टेशन हे शासकीय नारळ अर्पण करतात. अलीकडे कोळी बांधवांसोबतच इतर समाजातील नागरिकांकडून नारळ अर्पण करण्याची संख्या वाढली आहे.
त्यातच समुद्रावर विविध खाद्यपदार्थांची दुकाने येत असल्याने या सणाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही तास कुटुंबासमवेत बंदरावर येऊन हा सण साजरा करण्यात आनंद मिळत आहे.
बंदी कालावधी कमी..
शासनाने मासेमारी बंदीचा कालावधी कमी केला आहे. त्यामुळे काही मच्छीमार उदरनिर्वाहासाठी या सणाची वाट न पाहत पावसाचा अंदाज घेऊन मासेमारी करीत आहेत. त्यामुळे या सणाची असलेली उत्कंठा कमी होताना दिसत आहे. तर अजूनही काही कोळीबांधव असे आहेत की, समुद्राला नारळ अर्पण केल्याशिवाय आपल्या मासेमारी व्यवसायाला सुरुवात करीत नाहीत. एकंदर पाहता हा सण ज्या जोशाने साजरा व्हायला हवा तसा जोश, उत्साह आता दिसून येत नाही. ज्याच्यामुळे आपला उदरनिर्वाह होतो, मत्स्य खवय्यांची चंगळ होते, मत्स्यविक्रेत्यांची आर्थिक पत सुधारते असा सण सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याची गरज आहे.
- प्रथमेश गुरव, वेंगुर्ला