अकोले : दुधाचे दर कमालीचे घसरल्यामुळे राज्यभर शेतकरी संघटना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलने, निदर्शने आणि आमरण उपोषण करण्यात येत आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील दूध उत्पादक शेतकरी श्री. संदीप दराडे व अंकुश शेटे हे गेल्या ६ दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्याचबरोबर मागच्या ४ दिवसांपासून किसान सभेचे अजित नवलेसुद्धा उपोषणाला बसले आहेत. अजूनही या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
दरम्यान, मागच्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाला प्रशासनाकडून कोणताच साकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलकांनी थेट अकोले तहसील कार्यालयात जनावरे बांधली आहेत. या आंदोलनाला सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा पाठिंबा दिला आहे. तर दूध संघाच्या मनमानी कारभारावर सरकारचे लक्ष का नाही? आदेश न पाळणाऱ्या दूध संघावर कारवाई का केली जात नाही असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
या आंदोलनाला अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असून परिसरातील अनेक ग्रामपंचायती आणि दूध संकलन केंद्रांकडून ठराव करून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा दूध उत्पादक शेतकरी आणि किसान सभेचे अजित नवले यांनी केला आहे.
काय आहे दूध दराचा नेमका प्रश्न?
दुधाचे दर घसरल्यामुळे आणि दूध उत्पादकांच्या आंदोलनामुळे शासनाने दुधाचे दर ठरवण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीच्या अभ्यासपूर्ण अहवालानंतर शासनाने दुधाला ३४ रूपये प्रतिलीटर दर देण्याचा आदेश काढला होता. प्रत्येक तीन महिन्याला समितीने नवा अहवाल द्यावा आणि त्यानुसार दरामध्ये चढउतार करावेत असंही शासनाने आपल्या आदेशामध्ये म्हटलं होतं.
पण हा निर्णय निघाल्यानंतर काही दिवसांतच दुधाचे दर पुन्हा खाली आले. शासनाने ३४ रूपये प्रतिलीटर दर जाहीर केला असला तरी दूध संघांकडून शेतकऱ्यांना २४ ते २६ रूपये प्रतिलीटर एवढा दर देण्यात येत आहे. तर मंत्री समितीच्या बैठकीतही शासनाने जाहीर केलेला दर कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना देता येणार नाही अशी भूमिका दूध संघांनी घेतली होती. त्यामुळे दूध संघांवर नियंत्रण कुणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.