दुधाचे दर कमी झाल्यामुळे राज्य सरकारने खासगी व सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलीटर ५ रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला तरी हे अनुदान मिळवणे शेतकऱ्यांसाठी म्हणावे तेवढे सोपे नाही. या निर्णयामध्ये सरकारने अनेक आडकाठ्या घालून ठेवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे हे अनुदान केवळ एका महिन्यासाठी असणार आहे.
मागच्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन सरकारने अनुदान जाहीर केल्यानंतर अखेर शांत झाले. संघाकडून दुधाला दर कमी मिळतो म्हणून आंदोलन उभे राहिले होते. यावर तोडगा म्हणून सरकारने अनुदान जाहीर केले पण त्यामध्ये अटी आणि शर्ती लादल्यामुळे सरकारने अनुदान जाहीर करून शेतकऱ्यांची चेष्ठा केली आहे असंच म्हणावं लागेल. दूध उत्पादन करणाऱ्या किती शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा होणार हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे.
दुधाला २७ रूपये दराची अट
३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ साठी किमान २७ रूपये प्रतिलीटर दर दूध संघांना शेतकऱ्याना रोख किंवा बँक खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना प्रतिलीटर पाच रूपये अनुदान त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे थेट वर्ग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३.५/८.५ या गुणप्रतिपेक्षा प्रती पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफसाठी ३० पैसे कमी तर वाढ होणाऱ्या फॅट व एसएनएफसाठी ३० पैशांची वाढ करण्यात येणार आहे. यामुळे जर दुधाला २७ रूपयांपेक्षा कमी दर मिळाला तर शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
केवळ एका महिन्याच्या कालावधीसाठी मिळणार अनुदान
११ जानेवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालवधीसाठी या अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याआधी किंवा त्यानंतर विक्री करण्यात आलेल्या दुधाला अनुदान मिळणार नाही.
सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार
सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देण्यात येणार आहे. पण केवळ एका महिन्याच्या अनुदान योजनेसाठी हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे हे विशेष.
अटी व शर्ती
या योजनेत सहभागी होण्यासाठी खासगी व सहकारी दूध संघांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांकडे अर्ज करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी, पशुधनाच्या आधार कार्डशी (Ear Tag) लिंक असणे गरजेचे आहे. सदर अनुदानाची रक्कम ३ समान हप्त्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. दूध संघांनी रोज खरेदी केलेल्या दुधाचा हिशोब दररोज अद्ययावत ठेवणे गरजेचे असेल. त्यासाठी आयुक्त शाहनिशा करून अनुदानाची रक्कम वितरीत करतील. या अटींची पूर्तता शेतकऱ्यांना आणि दूध संघांना करावी लागणार आहे.
किती ठिकाणी मिळतोय २७ रूपये दर?
राज्यातील विविध ठिकाणी वेगवेगळा दर असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ साठी २४ ते २६ रूपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २६ ते २७ रूपयांच्या आसपास दर मिळत आहे. ठिकाणानुसार आणि दुधाच्या आवकेनुसार दूध दर कमी जास्त होत असून बहुतांश दूध संघ २७ रूपयांपेक्षा कमी दराने दुधाची खरेदी करत आहेत. त्यामुळे खूप कमी शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.